बार्न्स स्कूलच्या संपाचे अद्यापही भिजत घोंगडे
By Admin | Updated: July 14, 2016 01:34 IST2016-07-14T01:25:46+5:302016-07-14T01:34:37+5:30
उपासमार : सूचनांना केराची टोपली

बार्न्स स्कूलच्या संपाचे अद्यापही भिजत घोंगडे
भगूर : देवळाली कॅम्प येथील बार्न्स स्कूल येथे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला शंभर दिवस उलटूनही मुख्याध्यापक संपाची दखल घेत नसल्याने घोंगडे भिजत असून यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचारी व शाळा प्रशासन यांची एकत्रित बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी गेलेल्या खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर व कार्यकर्त्यांना न्यायप्रविष्ट प्रकरण असे कारण देत मुख्याध्यापक ज्युलियन लुक यांनी नकार दिला.
युनियन अध्यक्ष संजय चव्हाण यांनी बार्न्स स्कूलचे मुख्याध्यापक ज्युलियन लुक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी चव्हाण यांना काहीही प्रतिसाद दिला नाही. संपावर गेलेल्या कायम कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कामावर हजर होता यावे अशी इच्छा उपमुख्याध्यापक किथ एव्रेट यांनी व्यक्त केली आहे. यावेळी चंद्रकांत कासार, उत्तम अहेर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)