दिवाळीत उडाला ध्वनिप्रदूषणाचा ‘बार’

By Admin | Updated: November 18, 2015 22:11 IST2015-11-18T22:09:40+5:302015-11-18T22:11:09+5:30

‘सीबीएस’ आघाडीवर : ध्वनीने ओलांडली पातळी

'Bar' of sound pollution fired in 'Diwali' | दिवाळीत उडाला ध्वनिप्रदूषणाचा ‘बार’

दिवाळीत उडाला ध्वनिप्रदूषणाचा ‘बार’

नाशिक : प्रकाशाचा उत्सव अर्थात दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात शहर व परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी नाशिककरांनी वाजविलेल्या फटाक्यांमुळे शहरात लक्ष्मीपूजन-पाडव्याला ध्वनिप्रदूषणाचा बार उडाला. ध्वनीने सर्वसाधारण पातळी ओलांडल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळी उत्सवात केलेल्या ध्वनिप्रदूषण निरीक्षणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजन ते भाऊबीजपर्यंत संपूर्ण राज्यातील सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवाजाची सर्वसाधारण पातळी निश्चित करत त्यानुसार दिवस-रात्रीचे किमान व कमाल ध्वनी मोजला. शहरात पाच ठिकाणी ध्वनीची पातळी डेसिबलमध्ये मोजण्यात आली. दरम्यान, सीबीएस येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ८१.९ इतकी सर्वसाधारण ध्वनी पातळी होती; मात्र रात्री दहा वाजेपर्यंत कमाल ८५.७ डेसिबलपर्यंत ध्वनी जाऊन पोहचला. चार डेसिबलने दिवसा ध्वनिप्रदूषण वाढले, तर रात्री सर्वसाधारण पातळी ८१.७ इतकी निश्चित केली गेली होती. पहाटे सहा वाजेपर्यंत कमाल ध्वनी ८७.७ पर्यंत गेला. सहा डेसिबल ध्वनीने सर्वसाधारण पातळी लक्ष्मीपूजनाला ओलांडली. पाडव्याला ध्वनीची सर्वसाधारण पातळी ७७.७ होती. रात्री दहापर्यंत कमाल ध्वनी ८२.३ पर्यंत पोहचला व भाऊबीजच्या पहाटेपर्यंत ध्वनी ७८.५ पर्यंत पोहचला होता, तर रात्री दहापर्यंत ८१.५ डेसिबलपर्यंत वाढला. एकूणच शनिवारी (दि. १३) पहाटेपर्यंत ध्वनीची तीव्रता ८०.५ डेसिबलपर्यंत मोजली गेली. एकूणच शहराच्या सीबीएस परिसरात लक्ष्मीपूजन (दि. ११) ते शनिवार (दि. १४) सहा वाजेपर्यंत सातत्याने आवाजाच्या सर्वसाधारण पातळीपेक्षा तीन ते आठ डेसिबलने ध्वनी वाढला. तसेच पंचवटी परिसरातही शनिवारपर्यंत सहा ते दहापर्यंत व सिडको परिसरातही आवाजाच्या सरासरी पातळीपेक्षा सहा ते दहा डेसिबलपर्यंत वाढल्याची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Bar' of sound pollution fired in 'Diwali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.