बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:44+5:302021-09-21T04:15:44+5:30

पर्यावरणपूरक गणरायाला निरोप : जिल्ह्यात ठिकठिकाणी मूर्ती दान, ‘देव घ्या देवपण घ्या’ उपक्रमाला प्रतिसाद सिन्नर : सिन्नर शहरासह ग्रामीण ...

Bappa, come early next year! | बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या !

बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या !

पर्यावरणपूरक गणरायाला निरोप : जिल्ह्यात ठिकठिकाणी मूर्ती दान, ‘देव घ्या देवपण घ्या’ उपक्रमाला प्रतिसाद

सिन्नर : सिन्नर शहरासह ग्रामीण भागात गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. नगर परिषदेने मूर्ती संकलन करण्यासाठी १४ ठिकाणी ३५ ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती. त्यात साडेपाच हजार मूर्तींचे संकलन झाले. या सर्व मूर्तींचे सिलव्हर लोटस् स्कूलमध्ये तयार करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात ‘देव घ्या देवपण घ्या’ उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सिन्नर शहरासह ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अतिशय नगण्य प्रमाण होते. घरगुती गणेशोत्सव विसर्जनासाठी नगर परिषदेने पाणीसाठा कमी असल्याने नगर परिषदेकडे मूर्ती संकलन करण्याचे आवाहन केले होते. सरदवाडी धरण, देवनदी, शिवनदी येथे पाणी कमी असल्याने पाणीसाठा प्रदूषण होऊ नये यासाठी सिल्व्हर लोटस स्कूलच्या जलतरण तलावात कृत्रिक कुंडाची निर्मिती केली होती. नगर परिषदेने १४ ठिकाणी ३५ ट्रॅक्टर उभे करून मूर्ती व निर्माल्य संकलन करण्याचा उपक्रम राबविला. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ट्रॅक्टरमधून संकलित केलेल्या गणेशमूर्ती जमा करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा नाशिक ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, तहसीलदार राहुल कोताडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, प्रकल्प अधिकारी अनिल जाधव यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा या संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने साडेपाच हजार गणेशमूर्ती संकलित झाल्या. दरम्यान, काही घरगुती गणेशमूर्तींचे विहिरी, थोडाफार पाणीसाठा असलेली तळे याठिकाणी नागरिकांनी मनोभावे पूजा, आरती करीत निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर करीत गणेश विसर्जन करण्यात आले.

ग्रामीण भागातही गणरायाला साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. घरगुती गणेशमूर्तींचे अवर्षणाच्या पार्श्वभूमीवर जेथे पाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी विसर्जन करण्यात आले. अनेकांनी सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते.

Web Title: Bappa, come early next year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.