नोटबंदीचा चोरांनाही फटका, आता 10 व 100 रुपयांच्या नोटांवरच डल्ला
By Admin | Updated: November 15, 2016 11:49 IST2016-11-15T11:16:30+5:302016-11-15T11:49:58+5:30
नाशिकमधील घोटी शहरात चोरट्यांनी घरफोडीमध्ये केवळ 10 रुपये आणि 100 रुपयांच्याच नोटा चोरल्याची घटना समोर आली आहे.

नोटबंदीचा चोरांनाही फटका, आता 10 व 100 रुपयांच्या नोटांवरच डल्ला
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 15 - काळा पैसा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र या निर्णयाची झळ आता काळा पैसा धारकांसहीत चोरट्यांना बसत असल्याची घटना समोर आली आहे.
नाशिकमधील घोटी शहरात घरफोडी आणि चोरी होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यातही नोटबंदीच्या निर्णयामुळे चोरट्यांनी 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटांकडे पाठ फिरवत आता घरगुती साहित्य आणि कमी किंमतीच्या नोटा चोरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे घरफोडीची प्रकरणं आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
नुकतेच, चोरट्यांनी घरफोडीमध्ये केवळ दहा आणि 100 रुपयांच्याच नोटा चोरल्याची घटना घोटी शहरातून समोर आली आहे. शहरातील डॉ.आंबेडकर नगरमधील रोकडे कुटुंब मुंबईमध्ये लग्नासाठी आले होते. याचाच फायदा घेत अज्ञातांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून दोन गॅस सिलिंडर, एक मोबाईल, तसेच केवळ दहा रुपये आणि 100 रुपयांच्या नोटा अशी एकूण जवळपास 10 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
घरी परतल्यानंतर रोकडे कुटुंबाला चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी लगेचच घोटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नोटबंदीच्या परिणामामुळे आता दरोडेखोरदेखील पैशांऐवजी घरगुती वस्तू चोरत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी,अशी मागणी देखील होऊ लागली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून घोटी शहरात घरफोड्या, दुकानांचे शटर तोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, चलनातून 500, 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर तरी चोरीच्या घटनांना आळा बसेल, असे पोलिसांना वाटत होते. मात्र, तसे न होता उलट चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊन चोरट्यांनी घरगुती साहित्य आणि कमी किंमतीच्या नोटा चोरण्याची शक्कल लढवली आहे.