मिरज पूर्वमध्ये केळी उत्पादक संकटात
By Admin | Updated: April 30, 2015 00:24 IST2015-04-29T23:32:32+5:302015-04-30T00:24:39+5:30
दर घसरला : परराज्यातून आयात, जादा उत्पादनामुळे उठावही घटला

मिरज पूर्वमध्ये केळी उत्पादक संकटात
सुशांत घोरपडे - म्हैसाळ -केळी उत्पादनातील नफा पाहून मिरज पूर्वभागातील अनेक शेतकरी केळी उत्पादनाकडे वळले खरे, पण केळीच्या दराबाबतच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. सध्या दर पडल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारात केळीचा दर चढताच असला तरी घाऊक बाजारात मात्र शेतकऱ्यांना मिळणारे पैसे तुटपुंजे आहेत. परिणामी कर्जे काढून केळी लागवडीकडे वळलेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात आहेत.
केळी उत्पादनात एक एकर लागवडीसाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. उत्पादन व्यवस्थित मिळाल्यास व त्याला योग्य दर मिळाल्यास त्यापासून लाखो रुपये उत्पन्न मिळू शकते. हे आर्थिक गणित लक्षात आल्याने मिरज पूर्व भागातील म्हैसाळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बॅँका, पतसंस्था, सावकार यांच्याकडून कर्ज घेऊन केळी लागवड केली. उत्पादन खर्च जरी जास्त असला तरी, देखभालीचा फारसा त्रास नसल्याने, तसेच नैसर्गीक आपत्तीचाही फारसा परिणाम होत नसल्याने शेतकरी धाडसाने केळीलागवडीकडे वळले. मात्र सध्या उत्पादनक्षमता जास्त असून, बाजारपेठेत केळीला मागणी कमी आहे. केळीला सहा महिन्यांपूर्वी प्रतिकिलो १२ ते १४ रुपये दर होता, सध्या तो तीन ते चार रुपयांपर्यंत घसरला आहे.
बाजारपेठेत सर्वसामान्य ग्राहक ज्या दराने केळी खरेदी करतो, त्या केळीचे दर वाढले आहेत. केळीपासून बनविण्यात येणारे चिप्स, पापडी आदी उपवासाच्या पदार्थांच्याही किमती गगनाला भिडल्या आहेत. मग शेतकऱ्यांनाच दिला जाणारा दर कमी कसा, असा प्रश्न केळी उत्पादक शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.
त्यातच माल घेऊन जाण्यासाठी व्यापाऱ्यांना दिवसातून अनेक वेळा विनवावे लागते, पण व्यापारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. माल घेण्यासाठी आलेच, तर एकदम कमी दराने माल खरेदी करतात. काही व्यापारी तर केळी परराज्यातून मागवत असल्याची चर्चा आहे. म्हैसाळ येथील मनोज जाधव या प्रगतशील शेतकऱ्याने जवळपास २९०० केळीची रोपे दर नसल्यामुळे परत पाठवली आहेत.
दलालांची मक्तेदारी...
एकेकाळी आरग, बेडग, म्हैसाळ हा पट्टा पानमळ्यांसाठी प्रसिध्द होता. म्हैसाळ योजनेचे पाणी आले खरे, पण दूषित पाण्यामुळे पानांची मुळे कुजू लागल्याने हळूहळू पानमळे निघाले आणि ऊस वाढला. ऊस घालविण्यासाठीचा त्रास, दराची आंदोलने, पैसे वेळेवर नाहीत, या वैतागातून येथील धाडसी शेतकरी द्राक्षबागांकडे वळले, मात्र त्यामध्येही निसर्गाची साथ फारशी लाभत नसल्याने कमी जोखमीचे, शाश्वत व हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी केळी लागवडीकडे वळला आहे. मात्र आता केळीचे उत्पादन वाढल्याने मालाला बाजारात उठाव नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. शिवाय येथेही दलालांची मक्तेदारी वाढल्याने अपेक्षित दर मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.