अवजड वाहनांना बंदी
By Admin | Updated: September 16, 2016 22:22 IST2016-09-16T22:21:46+5:302016-09-16T22:22:44+5:30
सप्तशृंगगड : रस्त्याचे काम संथ गतीने; भाविकांमध्ये नाराजी

अवजड वाहनांना बंदी
वणी/पांडाणे : सप्तशृंगगडावर जाणाऱ्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, गडावर जाणाऱ्या दूर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. तरी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी भाविकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या सप्तशृंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचा भाग यू टर्नजवळ खचल्याने अवजड वाहनांना वाहतूक गेल्या २ आॅगस्टपासून बंद करण्यात आली आहे. सुरक्षितेच्या दृष्टिकोणातून छोट्या आकाराच्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
धोकादायकरीत्या खचलेल्या या भागाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
ठेकेदाराचा वेळकाढूपणा व सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष यामुळे त्यात भरच पडली आहे. नवरात्र उत्सव तोंडावर आला असताना सदर कामाची मंदावलेली गती हे भाविकांच्या चिंतेचे मूळ कारण आहे. सध्या गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार भाविकांना घ्यावा लागतो. खासगी वाहनचालक मनमानी करत भाविकांकडून भाडे वसूल करतात. या मार्गावरील एस.टी. बसेसची सुविधा बंद झाल्यामुळे भाविकही नाइलाजाने खासगी वाहनाचा आश्रय घेतात. (वार्ताहर)