जिल्ह्यात चारा वाहतुकीवर बंदी
By Admin | Updated: September 23, 2015 23:18 IST2015-09-23T23:17:52+5:302015-09-23T23:18:22+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : महिनाभराचा साठा उपलब्ध

जिल्ह्यात चारा वाहतुकीवर बंदी
नाशिक : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कमी अधिक प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिक जिल्ह्यातील चारा अन्य जिल्ह्यात वा परराज्यात वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.
या संदर्भातील आदेश सर्व तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, चारा उत्पादक व विक्रेत्यांना वैयक्तिकरीत्या नोटीस बजावणे शक्य नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरवर्षी सप्टेंबरपर्यंत समाधानकारक कोसळणाऱ्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटत असे, यंदा मात्र जिल्ह्णात पावसाने अडीच महिन्यांपासून दडी मारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जसा आ वासून उभा होता तशीच आता जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात गेल्या आठवड्यातील पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली, परंतु जो काही पाऊस झाला आहे, त्यातून जनावरांच्या चाऱ्यासाठी हातभार लागण्याची शक्यता नाही. खरिपाची पिकेही हातची गेल्याने त्यातूनही चारा मिळणे अवघड होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे जो काही साठवलेला सुका चारा असेल किंवा वन खात्याच्या कुरणांमध्ये हिरवा चारा असेल त्याच्या विक्रीस व वाहतुकीस बंदी घालण्याचे ठरविण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्णात आॅक्टोबर अखेरपर्यंत चारा पुरेल अशी परिस्थिती आहे. त्यात वन खात्याकडूनही माहिती मागविण्यात आली असून, त्यातून खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी, जिल्हाधिकाऱ्यांनी काल या संदर्भात आदेश काढून जिल्ह्णातील चारा परजिल्ह्णात वा परराज्यात वाहतुकीस बंदी घातली आहे व त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहेत. २० नोव्हेंबरपर्यंत ही बंदी घालण्यात आली असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८६० चे कलम १८८ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.