पाऊस लांबल्याने बळीराजा चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST2021-06-23T04:10:44+5:302021-06-23T04:10:44+5:30

सिन्नर (शैलेश कर्पे) : अवर्षणग्रस्त म्हणून ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यात सलग दोन वर्षे पाऊस झाल्याने समाधानाचे वातावरण होते. यावर्षी ...

Baliraja worried about prolonged rains | पाऊस लांबल्याने बळीराजा चिंतातुर

पाऊस लांबल्याने बळीराजा चिंतातुर

सिन्नर (शैलेश कर्पे) : अवर्षणग्रस्त म्हणून ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यात सलग दोन वर्षे पाऊस झाल्याने समाधानाचे वातावरण होते. यावर्षी जून महिना सरत आला असताना अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतातुर झाल्याचे चित्र सिन्नर तालुक्यात दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षात सिन्नर तालुक्यात वरुणराजा बरसल्याने उन्हाळ्यातही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची गरज भासली नव्हती. यावर्षी चांगला पाऊस राहील, असा हवामान खात्याचा अंदाज असताना पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत फक्त ६९ मिमी पाऊस झाला आहे. पेरणीसाठी सलग दोन-तीन दिवस पाऊस अपेक्षित असतो. ८० ते १०० मिमी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करणे योग्य नसते. मात्र यावर्षी पावसाने सिन्नर तालुक्याकडे पाठ फिरविल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी बी-बियाणांची जुळवाजुळव केली आहे. मात्र पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. सिन्नर तालुक्यात ६२ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. त्यात सोयाबीनचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. २८ हजार हेक्टरवर सोयाबीन, १४ हजार हेक्टरवर मका, तर आठ हजार हेक्टरवर बाजरी पेरणीचे उद्दिष्ट आहे. मात्र तालुक्यात आतापर्यंत केवळ १ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या असून, पाऊस लांबल्याने सदर पेरणीही वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सिन्नर तालुक्यात खरिपाचे प्रमाण जास्त असते. पूर्वभागात तर पावसाच्या पाण्यावर केवळ खरिपाचे एक पीक घेतले जाते. त्यावर शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक बजेट असते. मात्र पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. पाऊस लांबल्याचा त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत असतो. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी आभाळाकडे नजरा लावून बसला आहे. पाऊस पडावा आणि खरिपाची पेरणी व्हावी यासाठी शेतकरी वरुणराजाला साकडे घालत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

--------------------

९५ गावे कोरोनामुक्त

सिन्नर तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात सध्या २२३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात नगरपरिषद हद्दीतील २९, तर ग्रामीण भागातील १९४ रुग्णांचा समावेश आहे. १२६ पैकी ९५ गावे कोरोनामुक्त झाल्याने सिन्नर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, आत्तापर्यंत सिन्नर तालुक्यात २१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सिन्नर तालुक्यात आत्तापर्यंत ५५ हजार नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे.

------------------------------

गोळीबार, खुनाच्या घटनेने तालुका हादरला

सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे ठाकरवाडी भागात एका युवकाने चारित्र्याच्या संशयावरून दांपत्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची घटना घडली. घटनेच्या तीन दिवसानंतर गोळीबार करणारा संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ही घटना घडते ना घडते तोच माळेगाव औद्योगिक वसाहतीत अल्पवयीन मुलाने युवकाचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडल्याने तालुका हादरून गेला. खून केल्यानंतर संशयित अल्पवयीन मुलगा स्वत:हून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला. गेल्या महिन्याभरात सिन्नर तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चोऱ्यामाऱ्यांसह खून व गोळीबाराच्या घटना घडल्याने पोलिसांचा ताण वाढला आहे.

Web Title: Baliraja worried about prolonged rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.