बाजीराव महाजन यांची उचलबांगडी
By Admin | Updated: July 23, 2016 01:22 IST2016-07-23T01:07:48+5:302016-07-23T01:22:09+5:30
बाजीराव महाजन यांची उचलबांगडी

बाजीराव महाजन यांची उचलबांगडी
नाशिक : पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर सुरू असलेल्या जुगार अड्डा, गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्याची जुगाराच्या ठिकाणी असलेली उपस्थिती अशा संशयास्पद पद्धतीने काम सुरू असलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी उचलबांगडी करून नियंत्रण कक्षात बदली केली आहे़ या जागेवर गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या संदीप विधाते या राजकीय पदाधिकाऱ्याच्या जुगार अड्ड्यावर पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी गुरुवारी (दि़ २१) अचानक छापा टाकला़ या ठिकाणी ४१ जुगाऱ्यांकडून रोख रकमेसह १० लाख ८७ हजार रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला होता़ विशेष म्हणजे या कारवाईची मुंबई नाका पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यालाही पुसटशी कल्पना नव्हती़
पोलीस उपायुक्तांसह सहायक पोलीस आयुक्त तसेच विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामाला लागले असताना मुंबई नाका पोलीस ठाणे मात्र सुस्त होते़ विशेष म्हणजे या पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या भारतनगरमध्ये राजरोसपणे अवैध धंदे सुरू होते़ पोलीस ठाणे हद्दीतील अनेक भागातील टवाळखोरांकडे दुर्लक्ष तसेच अवैध धंदेचालकांकडून पोलीस ठाण्यातील ‘कलेक्टर’ कडून हप्तावसुलीच्या तक्रारीही वरिष्ठांपर्यंत पोहोचल्या होत्या़ त्यामुळेच आयुक्तांनी ही बदली केल्याची चर्चा आयुक्तालयात आहे़ दरम्यान, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन व जुगार खेळणारा मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी कैलास चव्हाण या दोघांची अधिकाऱ्यांसमवेत कसून चौकशी केल्याचे वृत्त आहे़ यानंतर सायंकाळी महाजन यांची नियंत्रण कक्षात, तर आनंदा वाघ यांची मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्तीचे आदेश काढण्यात आले़ (प्रतिनिधी)