बाजीराव जाधव : साडेनऊ कोटी मंजूर
By Admin | Updated: April 11, 2015 00:02 IST2015-04-11T00:01:56+5:302015-04-11T00:02:24+5:30
वनौषधींचे होणार बॅ्रण्ंिडग

बाजीराव जाधव : साडेनऊ कोटी मंजूर
नाशिक : आदिवासी बांधवांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आता आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी भागातील ३३ प्रकारच्या वनउपज व वनऔषधांचे पॅकेजिंग, मार्केटिंग आणि बॅ्रण्ंिडग करण्यात येणार असून, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव यांनी दिली.
दरम्यान, मोहाच्या फुलांपासून सरबत तयार करण्याचा प्रकल्प गडचिरोली येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला असून, तो यशस्वी झाल्यास राज्यभर तसे प्रकल्प राबविण्याबाबत महामंडळाची तयारी असल्याची माहिती सूत्रांंनी दिली. त्यामुळे आदिवासी विकास विभाग आता मोहाच्या फुलांपासून बनविण्यात येणाऱ्या सरबताच्या ‘मोहात’ अडकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर मोहाच्या फुलांपासून मद्य बनविण्यात येते.
आदिवासी भागातील हिरडा, मध, डिंक, चिंच, खुरसणी, मोह आदिंसह ३३ वेगवेगळ्या प्रकारच्या वनउपजांची अत्यंत कमी भावात आदिवासी बांधव शहरात येऊन विक्री करतात. मात्र, हे वनउपज स्वच्छ व साफ करून त्यांचे पॅकेजिंगचे काम महिला बचतगटांना देऊन त्यांच्या वनउपजांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास महामंडळ आता पुढाकार घेणार असून, या वनउपजांची पॅकेजिंगचे काम महिला बचतगटांना देऊन त्याचे मार्केटिंग व ब्रॅण्डिगचे कामही आदिवासी विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी भागातील वनऔषधींचे मार्केटिंग व ब्रॅण्डिग करण्यात येणार असल्याचे बाजीराव जाधव यांनी सांगितले. यासाठी आदिवासी विकास विभागाला केंद्र सरकारकडून ८ कोटी २५ लाख, तर राज्य सरकारकडून १ कोटी २५ लाख असा सुमारे साडेनऊ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने राज्यात सहा मील (गिरणी) उभारण्यात येणार असून, धान्य साठवणुकीसाठी २९ गुदामांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच महिला बचतगटांना व वैयक्तिक गटांना प्रत्येकी सहा टक्के अल्पदराने यासाठी कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी धान्य एकाधिकार खरेदी योजना व आधारभूत किमतीद्वारे खरेदी करण्यात आलेल्या धान्याचीही माहिती दिली. (प्रतिनिधी)