बैसाखीनिमित्त ‘बैसाखी पूरब - खालसा पंथ दे साजना’
By Admin | Updated: April 15, 2015 01:01 IST2015-04-15T01:01:32+5:302015-04-15T01:01:59+5:30
बैसाखीनिमित्त ‘बैसाखी पूरब - खालसा पंथ दे साजना’

बैसाखीनिमित्त ‘बैसाखी पूरब - खालसा पंथ दे साजना’
नाशिक : समाजातील प्रत्येकाने धर्माचा अर्थ समजून घेऊन धर्मात सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे, तसेच धर्म टिकविण्यासाठी धर्माच्या मर्यादेचे पालनही केले पाहिजे, असे प्रतिपादन शीख धर्माचे प्रचारक व कीर्तनकार हजितसिंग यांनी शिंगाडा तलावाजवळील गुरुद्वारात केले.शहरात मंगळवारी (दि. १४) पंजाबी नववर्ष असलेल्या बैसाखीनिमित्त ‘बैसाखी पूरब - खालसा पंथ दे साजना’निमित्त गुरुद्वारात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्वी परकीय आक्रमणांमुळे मानवाला हलाखीचे जीवन जगावे लागत होते. त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांचे प्रमाणही मोठे होते. अशा काळात गुरू गोविंदसिंह यांनी बैसाखी उत्सवादरम्यान पाच शीख निवडून त्यांना ‘पंज प्यारे’ म्हणून घोषित केले आणि खालसा धर्माची स्थापना केली. म्हणून या सणाला महत्त्व असून, सर्व शीख बांधवांनी गुरू गोविंदसिंह यांनी गुरू ग्रंथसाहिबमधून दिलेल्या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नवजात बालकांवर अमृतसंचार करण्याची प्रथाही यावेळी उत्साहात पार पडली. तसेच कथाविचार, कीर्तन आदि कार्यक्रम पार पडले.
या उत्सवात ‘गुरू ग्रंथसाहिब’चे पठण करण्यात आले. शीख धर्मीयांच्या एकत्रीकरणाच्या विचाराने सुरू झालेला हा सण आजही देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी शहरातील शीख बांधवांनी लंगरचा आस्वाद घेत खास रुह अफ्जाची कच्ची लस्सीदेखील ग्रहण केली. यावेळी धर्मप्रचारक चरणजित सिंग, बलजिंदर सिंग, कुलविंदर गुजराल आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)