‘जलयुक्त’च्या निधीवर बागलाण, कळवण, दिंडोरीचा डल्ला
By Admin | Updated: August 26, 2016 00:49 IST2016-08-26T00:43:38+5:302016-08-26T00:49:23+5:30
१० टक्के सेस निधी : पूर्वची कामे अद्यापही कागदावरच

‘जलयुक्त’च्या निधीवर बागलाण, कळवण, दिंडोरीचा डल्ला
नाशिक : गाळ काढण्याची आणि खोलीकरणाची कामे सुचविल्यानंतर ती जिल्हाधिकारी कार्यालयाने नाकारल्याने नव्याने सूचविलेली सुमारे १ कोटी १२ लाखांची कामे जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केली आहेत. त्यातही लघुपाटबंधारे पूर्वची कामे अद्याप मंजूर होणे बाकी आहे. मंजूर झालेल्या पश्चिम विभागाकडील २८ कामांत १९ कामे कळवण, बागलाण, दिंडोरी तालुक्यात असल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
समान निधी वाटपाचे धोरण असल्याचे सांगणाऱ्या अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सेसच्या निधीतून जलयुक्तची कामे सूचविताना आणि मंजूर करताना त्यात असमानता दाखविल्याने अन्य सदस्यांमधून आता नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दिंडोरी तालुक्यात मंजूर करण्यात आलेल्या सहा कामांपैकी १८ लाखांची पाच कामे एकाच गटात मंजूर करण्यात आली आहे.
उर्वरित पाच गटांचे काय? असा प्रश्न आता उपस्थित होण्याची शक्यता आहे. इगतपुरी तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट असताना अवघ्या एका गटात तीन लाखांचे काम मंजूर करण्यात आले आहे. लघुपाटबंधारे विभागाने १० टक्के सेसनिधीतून राखीव ठेवलेला अडीच कोटींचा निधी मागील वर्षाचा असल्याने या निधीतून कामे मंजूर करण्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक आहे. लघुपाटबंधारे पश्चिम विभागाने ही मान्यता मागील बैठकीत घेतल्याने त्यांची १ कोटी १२ लाखांची कामे मंजूर झाली असून, सर्व निधी खर्च होण्याची शक्यता आहे.
त्याउलट लघुपाटबंधारे पूर्व विभागाचा १ कोटी २२ लाखांचा निधी खर्चाला अद्याप सर्वसाधारण सभेची मान्यता नसल्याने हा
निधी खर्च होणे बाकी आहे. तूर्तास या असमान निधी वाटपाची
चर्चा जिल्हा परिषदेत आहे. (प्रतिनिधी)