बागलाण सभापतिपद अनुसूचित महिलेसाठी

By Admin | Updated: September 4, 2014 00:04 IST2014-09-03T22:52:40+5:302014-09-04T00:04:02+5:30

बागलाण सभापतिपद अनुसूचित महिलेसाठी

Baglan Chairman for Scheduled Caste | बागलाण सभापतिपद अनुसूचित महिलेसाठी

बागलाण सभापतिपद अनुसूचित महिलेसाठी



सटाणा : गेल्या साडेसात वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव असलेले बागलाण पंचायत समितीचे सभापतिपद जाहीर होऊन सोडतीत पुन्हा महिलांचेच नशीब फळफळले. यामुळे महिलांच्या गोटात ‘अच्छे दिन’ आले आहेत, तर कायमस्वरूपी अनु. जमातीसाठी राखीव असलेल्या सभापतिपदासाठी पुरुषांना लॉटरी लागावी म्हणून इच्छुक गणपती पाण्यात बुडवून होते, मात्र त्यांच्या नशिबी ‘बुरे दिन’ आल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
चौदा सदस्य असलेल्या बागलाण पंचायत समितीचे सभापतिपद गेल्या दहा वर्षांपासून कायमस्वरूपी अनु. जमातीसाठी राखीव आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील सदस्यांना उपसभापतिपदावरच समाधान मानावे लागते. असे असले तरी आपलीच चलती राहील यासाठी उपसभापतिपद मिळविण्यासाठी चुरस असते. अडीच वर्षापूर्वी निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने उपसभापती पदावर डोळा ठेवून शिवसेनेच्या अहिल्या माळी यांना सभापतिपदाचे आमिष दाखवून फिल्डिंग लावली होती. मात्र भाजपाने कॉँग्रेसकडे सभापतिपदासाठी अनु. जमातीचा महिला उमेदवार नसल्यामुळे उपसभापतीची आॅफर दिली होती. कॉँग्रेसही राष्ट्रवादीचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपाची आॅफर स्वीकारून नांदत आहेत. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने पंचायत समितीमधील भाजपाबरोबरची युती तोडली तरच कॉँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करू, असा दम भरून कॉँग्रेसचे एक प्रकारे नाक दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही कॉँग्रेसची आदळ आपट झाल्यानंतर आघाडी झाली खरी मात्र तीही औटघटकेची ठरली.
सभापतिपदाची मुदत एकवीस सप्टेंबरला संपते आहे. पदासाठी भाजपचे विद्यमान सभापती गीता सोनवणे, माजी सभापती जिजाबाई सोनवणे, शिवसेनेच्या अहिल्या माळी या इच्छुक आहेत तर उपसभापती पदासाठी कॉँग्रेसचे भास्कर बच्छाव, सोमनाथ सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे वसंतराव भामरे, रखमाबाई सोनवणे इच्छुक आहेत. या पदासाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.
मात्र विधानसभा निवडणुकीसाठी बागलाणच्या जागेवर दोन्ही कॉँग्रेस दावे करत असताना माजी आमदार संजय चव्हाण यांनी, तर राष्ट्रवादीला जागा सोडल्याचे जाहीर करून मीच पक्षाचा उमेदवार असल्याचा दावा केल्यामुळे कॉँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वथता पसरली आहे. अशी परिस्थिती असली तरी डिपॉझिट जप्त झालेल्या कॉग्रेसने चव्हाणांच्या बंडाळीमुळेच पक्षाचे नुकसान होत असल्याचा आरोप करून जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला
आहे .
याभूमिकेचा सभापती पदाच्या निवडणुकीवर परिणाम होवून तालुक्याचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
(वार्ताहर)

Web Title: Baglan Chairman for Scheduled Caste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.