कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर प्लॅस्टिकमुक्त
By Admin | Updated: April 15, 2015 00:18 IST2015-04-15T00:17:05+5:302015-04-15T00:18:25+5:30
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर प्लॅस्टिकमुक्त

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर प्लॅस्टिकमुक्त
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पर्यावरण राखण्यासाठी आणि स्वच्छ गोदावरीचा नारा देण्यासाठी ‘मिशन जी’ अर्थात गो ग्रीन अभियानाला बुधवारपासून (दि. १५) सुरुवात होणार आहे. यात नाशिकमधील सुमारे सहा हजार वॉर्डन सहभागी होणार आहेत. या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक महापालिका, भारत स्काउट आणि गाइड संस्था तसेच ऊर्जा प्रतिष्ठान या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या मैदानावर या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. शहरातील विविध ६३ शाळांमधील स्काउटचे विद्यार्थी यात सहभागी होऊन प्लॅस्टिकमुक्त नाशिकची शपथ घेणार आहेत. अभियानात सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी किमान वीस कुटुंबांपर्यंत पोहोचून प्लॅस्टिकमुक्तीचा जागर करेल. अशा पद्धतीने शहरातील एक लाख कुटुंबांपर्यंत स्काउटचे विद्यार्थी पोहोचतील. प्रत्येक विद्यार्थी कृतिशील उपक्रम म्हणून प्रत्येक कुटुंबात माहितीपत्रक आणि भाजीपाल्यासाठी एक पिशवी, स्टीकर देणार आहे. सदरचे शिबिर १५ ते १७ एप्रिलपर्यंत शहराच्या विविध भागात राबविण्यात येणार आहे. दररोज सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आणि त्यांनतर चार ते सहा या वेळेत मुले घरोघरी जातील. अभियानात सहभागी होणाऱ्या मुलांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. सदरचे अभियान यशस्वी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे. (प्रतिनिधी)