‘अजुनी रुसुनि आहे’!

By Admin | Updated: July 8, 2014 01:12 IST2014-07-08T00:11:58+5:302014-07-08T01:12:28+5:30

‘अजुनी रुसुनि आहे’!

'Azunini is Rusuni'! | ‘अजुनी रुसुनि आहे’!

‘अजुनी रुसुनि आहे’!

 

नाशिक : एक नव्हे, दोन नव्हे, तीन तीन आमदार, नाराज वसंत गिते यांची मनधरणी करण्यासाठी थेट राजसाहेबांच्या आदेशावरुन वसंतभाऊंच्या निवासस्थानी धावत गेले. भाऊंना पुढे घालून सरकारी विश्रामगृहावर घेऊन आले. बंद दरवाजाआड गुप्त चर्चा झाली. ती सुरु असतानाच खोलीचा दरवाजा उघडून राजसाहेब ताडकन बाहेर पडले. कोणाशीही चकार शब्द न बोलता, गाडीत बसून मुंबईकडे रवानाही झाले. वसंतभाऊंभोवती साहजिकच गराडा पडला. ‘आपण नाराज नाही’, असे त्यांनी सांगूनही टाकले, पण त्यांचे शब्द आणि त्यांची देहबोली यांच्यात कुठेही मेळ मात्र दिसत नव्हता.
जेमतेम पंधरा-वीस मिनिटांच्या या नाट्याने मनसेत ‘आॅल इज नॉट वेल’ असल्याची प्रचिती येऊन गेली. पुढील चर्चेसाठी म्हणे गिते यांना उद्याच मुंबईत पाचारण केले गेले आहे.
राज ठाकरे यांनी अलीकडेच स्थानिक पातळीवर काही संघटनात्मक बदल केले पण ते करताना, पक्षाचे सरचिटणीस असलेल्या व स्थापनेपासून पक्षाची घट्ट कास धरुन असलेल्या वसंत गिते यांना त्यांनी विश्वासात घेतले नाही. साहजिकच, गिते आणि त्यांचे समर्थक नाराज आहेत अशी चर्चा होत असताना, रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या खुद्द राज ठाकरे यांनाच या गटबाजीचे दर्शन घडले. गुडघ्याला दुखापत झाल्याचे निमित्त करून स्वत: गिते तर विश्रामगृहावर गेलेच नाहीत; परंतु जिल्हाप्रमुख आणि माजी शहरप्रमुखांबरोबरच सुमारे पंधरा नगरसेवकही गैरहजर राहिल्याने राज यांना त्याची दखल घ्यावीच लागली.
सोमवारी सकाळी राज हे गिते यांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात त्यांनी आमदार नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर आणि गिते यांच्याशी जवळीक असलेले दीपक पायगुडे यांनाच गिते यांच्या निवासस्थानी पाठवून दिले. मुंबई नाका येथील गिते यांच्या निवासस्थानीच पदाधिकारी आणि नगरसेवकांची गर्दी जमा झाली होती. सुमारे दोन तास गिते यांच्या घरी बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर सर्वजण बाहेर आले आणि एकाच मोटारीत बसून शासकीय विश्रामगृहावर आले. राज ज्या कक्षात उतरले आहेत तेथे चर्चा झाली. माजी शहराध्यक्ष समीर शेटे हेही यावेळी उपस्थित होते. परंतु बैठकीनंतर दहा मिनिटांतच राज ठाकरे बाहेर पडले आणि सरळ मोटारीत बसून मुंबईकडे रवाना झाले.
यानंतर बाहेर पडलेल्या गिते यांनी, आपण पक्षावर नाराज नाही. गेली २७ वर्षे मी सार्वजनिक जीवनात काम करीत आहेत. उलट आणखी जोमाने काम करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज यांच्या दौऱ्यातील आपली अनुपस्थिती केवळ गुडघा दुखापतीमुळे होती. त्यामुळे बऱ्याच चर्चा झाल्या. आता राज यांनी मुंबईस्थित डॉक्टरांची वेळ घेतली असून, मंगळवारी तेथे जाणार आहे. तेथेच राज यांच्याशी चर्चा करणार आहे, असेही गिते यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्यासह अनेक नगरसेवकही उपस्थित होते. नितीन सरदेसाई आणि दरेकर यांनी मात्र माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. यावेळी गिते समर्थकांनी घोषणाबाजी करीत शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला; परंतु गिते यांनी त्यांना थांबवले.
गिते यांनी काहीही दावे केले असले, तरी राज यांचे तडकाफडकी निघून जाणे आणि मुंबई येथे पुन्हा चर्चेसाठी बोलावणे यामुळे नाराजीनामा नाट्य संपुष्टात आले नाही हेच स्पष्ट झाले. आता मुंबईतील चर्चेत काय घडते, यावर गिते यांची पुढील वाटचाल अवलंबून आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Azunini is Rusuni'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.