‘निरी’ने उपसले ‘माहिती’चे हत्यार

By Admin | Updated: April 21, 2016 00:44 IST2016-04-21T00:32:09+5:302016-04-21T00:44:09+5:30

पालिकेकडून दमछाक : फायटोरीड प्रकल्पाबाबत माहितीस टाळाटाळ

'Aya' raises 'information' weapon | ‘निरी’ने उपसले ‘माहिती’चे हत्यार

‘निरी’ने उपसले ‘माहिती’चे हत्यार

नाशिक : सर्वसामान्य नागरिकाला महापालिकेकडून माहिती अधिकाराच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची माहिती मिळविण्यात किती यातना सहन कराव्या लागतात, याबाबतचे असंख्य अनुभव असतील; परंतु ‘निरी’सारख्या सरकारी संस्थेलाही जेव्हा एखादी माहिती प्राप्त करण्यासाठी माहिती अधिकाराचे हत्यार उपसावे लागणे महापालिकेच्या एकूणच भोंगळ कारभाराचे दर्शन घडविते. गंगापूर गावात फायटोरीड प्रकल्पाबाबत मनपाने काय कार्यवाही केली याबाबतची माहिती मिळविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून ‘निरी’ला झुंझावे लागत आहे. परंतु अद्याप महापालिकेने माहिती देण्याची तसदी घेतलेली नाही.
गोदावरी नदीची पूररेषा आणि प्रदूषणासंबंधी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान अर्थात ‘निरी’ या सरकारी संस्थेने आपला अहवाल दिलेला आहे. त्यात अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. निरीच्या अहवालासंबंधी अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीही नेमली होती. सदर उपसमितीचा अहवालही विभागीय आयुक्तांना सादर झालेला आहे. दरम्यान, निरीचा अहवाल गेल्या महासभेत प्रशासनामार्फत अवलोकनार्थ ठेवण्यात आला होता. परंतु सदर अहवाल इंग्रजीत असल्याने तो मराठीत सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. आता विभागीय आयुक्तांना एक पत्र पाठवून निरीने आपली व्यथा मांडली आहे. त्यात प्रामुख्याने, गंगापूर गावात नाल्याजवळ सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा फायटोरीड प्रकल्प उभारण्याबाबत निरीने काही सूचना केल्या होत्या. महापालिकेने सदर प्रकल्प उभारल्याचे सांगितले; परंतु त्याबाबत आपण समाधानी नसल्याचे निरीने पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाबाबत निरी गेल्या सहा महिन्यांपासून माहिती मागवित असताना महापालिकेकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे निरीला नाइलाजास्तव माहितीच्या अधिकाराचे हत्यार उपसावे लागले आहे. एका सरकारी संस्थेला महापालिकेकडून अशा प्रकारची वागणूक दिली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, शिवाय त्यातून महापालिकेच्या भोंगळ कारभाराचेही दर्शन घडले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Aya' raises 'information' weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.