भरीव कामांची अंजनेरीला प्रतीक्षा!
By Admin | Updated: July 29, 2016 01:44 IST2016-07-29T01:42:04+5:302016-07-29T01:44:22+5:30
यंत्रणेपुढे आव्हान : ३४.७१ टक्केच कामे पूर्ण

भरीव कामांची अंजनेरीला प्रतीक्षा!
संजय वाघ
त्र्यंबकेश्वर तालक्यातील अंजनेरी या ४९३४ लोकवस्तीच्या गावाला सुमारे दीड वर्षापूर्वी आदर्श संसद ग्राम योजनेच्या माध्यमातून दत्तक घेण्यात आले... गावकऱ्यांचे हृदय तेव्हा सुपाएवढे झाले होते... विकास, विकास काय म्हणता तो गावाच्या अंगाखांद्यावर ओसंडून वाहील अशी स्वप्ने जो तो रंगवित होता. एकूण १९० कामांचा आणि ६७७.१३ कोटी रुपयांचा सूक्ष्म आराखडा आखण्यात आला. जिल्हाधिकारी स्तरावर बैठकांमागून बैठकाही पार पडल्या. आराखड्याच्या कामात आणि रकमेतही घट झाली. १२१ कामे आणि ६२५ कोटी खर्चावर शिक्कामोर्तब झाले... जितक्या बैठका झाल्या, तेवढ्या प्रमाणात कामांची पूर्तता झाल्याचे वरकरणी सध्या तरी दिसत नाही. १२१ पैकी अवघी ४२ कामे (३४.७१ टक्के) पूर्ण झालेली असली तरी भरीव अशा कामांची अंजनेरी गावाला प्रतीक्षा लागून आहे.
अंजनेरी गावाला हनुमानाची जन्मभूमी म्हणून एक धार्मिक महत्त्व आहे. या पावनभूमीचा शासन योजनेच्या माध्यमातून विकास घडवून आणावा या उद्देशाने खासदार गोडसे यांनी हे गाव दत्तक घेतले. त्यांनी प्रयत्नही केले. दीड वर्षात ४२ कामे मार्गी लागली. त्यात तळ्याची वाडी व हनुमाननगर येथे डिजिटल अंगणवाडी, गावातील रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण, ग्रामपंचायत क्षेत्रात एलईडी दिव्यांचा वापर, गावातील विविध वाड्यांमध्ये सौर ऊर्जेचे दिवे आणि सौर पोलवर दिशादर्शक फलक या कामांचा समावेश आहे. ग्राम सचिवालय, स्मशानभूमीत निवारा शेड व संरक्षक भिंत, दऱ्याची वाडीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण, दोन ठिकाणी केटीवेअर आणि अंजनेरी गावठाणात डिजिटल अंगणवाडी ही सहा कामे मंजूर असली तरी प्रत्यक्ष कामाचा अद्याप मुहूर्त लागलेला नाही. २५ लाखाहून अधिक रकमेची दहाच्या वर कामे आजही मंजुरीसाठी रखडलेली आहेत. केंद्र शासनाची योजना तशी उत्तम आहे. पण सरकारी काम आणि
सहा महिने थांब असे जे बोलले जाते, त्यातही आता अपूर्णता वाटायला लागली आहे. दीड वर्षाचा काळ उलटला आणि मुदत पूर्ण व्हायला केवळ तीन महिने उरले आहेत. या अल्प वेळेत आराखडा प्रत्यक्षात उतरेल अशी चिन्हे दिसत नाहीत.