मालेगावी स्वच्छतेचा जागर
By Admin | Updated: January 9, 2016 22:07 IST2016-01-09T22:06:48+5:302016-01-09T22:07:48+5:30
विविध कार्यक्रम : प्रभात फेरी, पथनाट्यांनी परिसर दुमदुमला

मालेगावी स्वच्छतेचा जागर
मालेगाव : शहरात महानगर-पालिका, मनपा शिक्षक मंडळ व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, शनिवारपासून आयुक्त किशोर बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली.
यावेळी काढण्यात आलेल्या प्रभात फेरी व पथनाट्यांनी शहर दुमदुमले होते.
अभियानाची सुरुवात प्रभात फेऱ्यांनी करण्यात आली. येथील एटीटी विद्यालयात महापौर हाजी मो. इब्राहीम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त कमरुद्दीन शेख, गोविंद परदेशी, इकबाल जान मोहंमद आदि उपस्थित होते.
शहर स्वच्छतेसाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सात विभाग करण्यात येऊन पहिल्या व दुसऱ्या विभागाच्या फेऱ्या एटीटी विद्यालय, तिसऱ्या विभागाची मालेगाव कन्या विद्यालयातून, चौथ्या गटाची फेरी सरदार प्राथमिक शाळेपासून, पाचव्या गटाची काकाणी विद्यालयापासून, सहाव्या गटाची या.ना. जाधव विद्यालयापासून तर सातव्या गटाची केबीएच विद्यालयापासून काढण्यात आली. या फेऱ्यांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक सहभागी झाले होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांमुळे शहर दणाणले होते. यात अनेक शाळांनी जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात केले.
येथील महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून हा पहिलाच प्रयोग असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे स्वच्छ शहर ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाकारत येत नाही. (वार्ताहर)