रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता हवी
By Admin | Updated: January 11, 2017 00:34 IST2017-01-11T00:34:04+5:302017-01-11T00:34:17+5:30
रवींद्र सिंघल : रस्ता सुरक्षा सप्ताह उद्घाटन

रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता हवी
नाशिक : वाहतूक नियमांच्या वाढत्या उल्लंघनाकडे सामाजिक समस्या म्हणून पाहताना रस्ता सुरक्षेबाबत समाजात जागरूकता आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम, पोलीस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक पी. जी. खोडसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आदि उपस्थित होते. अपघात कमी करण्यासाठी मानसिकतेत परिवर्तन आणणे महत्त्वाचे आहे. पोलीस आणि परिवहन विभाग मिळून रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता आणण्याचे उपक्रम आयोजित करीत आहेत. अपघाताची नोंद करताना हेल्मेट घातले असल्याबाबत नोंद करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या ते म्हणाले. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन म्हणाले, विविध गुन्ह्यात होणाऱ्या मृत्यूपेक्षा रस्ते अपघात मानवहानीचे प्रमाण जास्त आहे. बऱ्याचदा अपघातात घरातील कर्तापुरुष गमावल्याने कुटुंबासमोर गंभीर समस्या उभी राहते. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून असे अपघात टाळणे महत्त्वाचे असून, हे अभियानचे उद्दिष्ट असून, शाळा- महाविद्यालयांना अशा अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. पोलीस उपायुक्त पाटील यांनी वाहतूक नियमांबाबत स्वयंशिस्त महत्त्वाची असल्याचे नमूद करून शिक्षक आणि पालकांची भूमिका जनजागृतीसाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्रास्ताविकांत कळसकर यांनी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यामागची भूमिका विशद केली. (प्रतिनिधी)