शिस्तबद्ध वाहन रॅलीने मोर्चाविषयी जागृती
By Admin | Updated: September 22, 2016 01:43 IST2016-09-22T01:42:56+5:302016-09-22T01:43:28+5:30
शिस्तबद्ध वाहन रॅलीने मोर्चाविषयी जागृती

शिस्तबद्ध वाहन रॅलीने मोर्चाविषयी जागृती
पाथर्डी फाटा : शनिवारी निघणाऱ्या भव्य मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जागृतीसाठी पाथर्डी पंचक्रोशीतील युवकांनी परिसरातील गावांमध्ये मोटारसायकल रॅली काढून वातावरण निर्मिती केली. बुधवारी सकाळी पाथर्डी गावातून निघालेली रॅली सुमारे पंचवीस गावांमधून नेण्यात येऊन दुपारी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून समाप्त झाली.
शनिवारी (दि. २४) नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाचा मोर्चा विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निघणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी विविध बैठका व विचार विनिमय, पोस्टर्स, बॅनर्स, स्टिकर्स यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. नाशिक शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्येही मोर्चाची जागृती व वातावरणनिर्मिती होण्यासाठी पाथर्डी पंचक्रोशीतील तरुणांनी दुचाकी रॅली काढली.
पाथर्डी येथील हनुमान मंदिर चौकात एका युवतीच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी रॅलीमार्गात हॉर्न न वाजविणे, आपली दुचाकी पुढे दामटण्याचा प्रयत्न न करणे, घोषणा न देणे, शिस्त पाळणे आदि महत्त्वाच्या सूचना समाजातील मान्यवरांनी युवकांना दिल्या. सर्व दुचाकींना भगवे ध्वज लावण्यात आले होते.
रॅलीच्या अग्रभागी युवतींनीही सहभागी होत भगवे ध्वज हाती घेतले होते. यावेळी अस्मिता देशमाने, नगरसेवक सुदाम कोंबडे, एकनाथ नवले, संजय डेमसे, संजय गायकवाड, शरद निकम, विजय डेमसे, विश्वनाथ धोंगडे, मदन डेमसे, माणिक मेमाणे, तानाजी गवळी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)