दर्जेदार, समान शिक्षणाच्या हक्काचा जागर
By Admin | Updated: November 13, 2014 00:35 IST2014-11-13T00:34:54+5:302014-11-13T00:35:44+5:30
शिक्षण संघर्ष यात्रा : महापालिकेसमोर निदर्शने; महापौरांचा निषेध

दर्जेदार, समान शिक्षणाच्या हक्काचा जागर
नाशिक : ‘शिक्षण आमच्या हक्काचं...,’ ‘शिक्षणाचा बाजार बंद करा.., ‘शिक्षणमंत्री चले जाव... अशा घोषणांनी आज शहर परिसर दुमदुमून गेला होता. तरुण, ज्येष्ठ, महिलांनी रस्त्यावर उतरून मनमानी कारभार करणाऱ्या इंग्रजी शाळा, महापालिका प्रशासन, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासह शिक्षणमंत्र्यांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत नाशिककरांचे लक्ष वेधले. दरम्यान, शिक्षण संघर्ष यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करून मनपा शिक्षण मंडळासह महापौरांचाही निषेध नोंदविला.
दर्जेदार व समान सरकारी शिक्षण हक्काचा जागर करण्यासाठी देशातील वीस राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ४५ सदस्य संस्था, दोनशे समविचारी सामाजिक संघटनांसोबत घेऊन अखिल भारतीय शिक्षण अधिकार मंचाच्या वतीने भारतभरातून शिक्षण संघर्ष यात्रा सुरू केली असून, ही यात्रा आज (दि.१२) सकाळी शहरात पोहचली. दरम्यान, यात्रेचे नाशिकरोड येथील शिवाजी चौकामध्ये विविध संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर यात्रेचा रथ थेट शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाच्या उंबऱ्यावर जाऊन पोहचला. यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या निष्क्रिय कारभाराविरोधी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. यावेळी उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांना विविध शैक्षणिक मागण्यांच्या पूर्ततेचे निवेदन देण्यात आले. पालकांवर अन्यायकारक फी वाढ लादणाऱ्या त्यानंतर तिडके कॉलनी येथील सेंट फ्रान्सिस शाळेभोवती शिक्षण संघर्ष यात्रेत सहभागी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करून शाळा व्यवस्थापनाचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी केली. महापालिक ा शिक्षण मंडळ प्रशासनाकडून जीपीओसमोरी बी. डी. भालेकर शाळा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी केल्या जाणाऱ्या षडयंत्राविरोधी संघर्ष यात्रेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारातही घोषणाबाजी व पथनाट्य सादर केले. भालेकर आणि अन्य शाळांच्या मागण्यांबाबत महापौरांकडे चर्चेसाठी गेलेल्या या कार्यकर्त्यांची समाधानकारक चर्चा झाली नाहची महापौरांनी चुकीची वागणूक दिली नाही आणि उपआयुक्त गोतीसे या विषयांकडे लक्ष पुरवत नाही असा आरोप करीत या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या यात्रेत शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच नाशिकचे डॉ. मिलिंद वाघ, संतोष जाधव, मुकुंद दीक्षित, श्रीधर देशपांडे, छाया देव, राजू देसले आदिंसह छात्रभारती संघटनेचे युवा कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)