पुरेशी झोप नसेल तर व्यायाम टाळा
By Admin | Updated: July 16, 2017 00:24 IST2017-07-16T00:24:10+5:302017-07-16T00:24:25+5:30
श हरात मागील पंधरवड्यात ‘फिटनेस’ राखण्यासाठी विविध प्रकारे व्यायाम करताना तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांचे कारण एक समान आढळून येते.

पुरेशी झोप नसेल तर व्यायाम टाळा
एक्सपर्ट व्ह्यू
डॉ. दीपक सोनवणी ।
श हरात मागील पंधरवड्यात ‘फिटनेस’ राखण्यासाठी विविध प्रकारे व्यायाम करताना तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांचे कारण एक समान आढळून येते. ते म्हणजे पुरेशी झोप न झाल्यामुळे व्यायाम करताना रक्तपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणे.
शहरात जीममध्ये व्यायाम करताना तसेच सायकल चालविताना तरुणांच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर या तरुणांपैकी कोणीही आजारी नव्हते, तसेच हृदयरोगाशी संबंधित लक्षणेही कोणामध्ये नव्हती. मी मागील पंधरा वर्षांपासून बॉडी बिल्डिंग या खेळाशी संबंधित आहे. व्यायाम के ल्यामुळे शरीर सृदृढ राहते, यात शंका नाही; मात्र व्यायामाला पुरेशी झोप, आहार, पथ्ये यांची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे. कुठलाही हाय-इन्टेन्सीटी व्यायाम करण्यापूर्वी झोप पाच तासांपेक्षा कमी झालेली नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे. झोप कमी झालेली असल्यास शरीरामध्ये टीएनएफ-अल्फा आणि सी रिअॅक्टीव प्रोटीन हे टॉक्सीक घटक वाढण्याची शक्यता असते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अपुरी झोप झाल्यामुळे उच्च रक्तदाबालाही निमंत्रण मिळू शकते. तसेच २५ ते ५० वयापर्यंत उच्च रक्तदाब व हृदयविकारात वाढत होण्याची शक्यता तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत असते. जेव्हा पाच तासांपेक्षा कमी झोप झालेली असते तेव्हा दिवसभर थकवा, चिडचिडेपणा, कंटाळवाणा, निरुत्साह जाणवतो. अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘रेम’ असे म्हटले जाते. व्यक्तीला हृदयविकाराची लक्षणे आढळून आलेली नसेल तरीदेखील जर अपुरी झोप घेऊन अशा व्यक्तीने फास्ट कार्डिओ व्यायाम, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, केले तर रक्तदाब वाढून मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा होण्याचा धोका असतो. अतिउच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या फाटूदेखील शकतात आणि व्यक्ती दगावू शकते. त्यामुळे किमान सहा तास पुरेशी झोप आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी. त्याशिवाय व्यायाम करणे धोक्याचे ठरेल, हे लक्षात घ्यावे. - (उपाध्यक्ष, बॉडीबिल्डिंग असोसिएशन, इंडिया)