सुसंवादातून गुन्हेगारीस आळा
By Admin | Updated: October 27, 2015 22:50 IST2015-10-27T22:47:36+5:302015-10-27T22:50:18+5:30
अतुल झेंडे : परिसरातील नागरिक, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

सुसंवादातून गुन्हेगारीस आळा
इंदिरानगर : पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद असेल, तर गुन्हेगारीस आळा बसण्यास मदत होईल, असे प्रतिपादन परिमंडळ दोनचे सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी केले़ नागरिकांसोबतच्या सुसंवादासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या पायी पेट्रोलिंग अभियानप्रसंगी ते बोलत होते़
यावेळी झेंडे यांनी सावरकर चौक ते मोदकेश्वर मंदिर या रस्त्यावरील दुकानदारांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली़ तसेच पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलांनी अंगावरील दागिन्यांची काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले़ वृद्धांना एटीएममधून पैसे काढून देतो असे सांगितल्यास त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, तसेच कोणी दादागिरी किंवा त्रास देत असल्यास तत्काळ १०० क्रमांकावर फोन करून माहिती देण्याचे आवाहन केले़ महिलांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मी पोलीस आहे असे सांगून कुणी दागिने काढून द्या, असे सांगितल्यास आरडाओरड करा़ पोलीस हे नागरिकांचे मित्र असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास गुन्हेगारी निश्चितच कमी होईल, असे झेंडे यांनी सांगितले़ या अभियानात सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, एस़ वऱ्हाडे, केतन राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते़ (वार्ताहर)