नवरात्रोत्सवामुळे अवतरले चैतन्य!
By Admin | Updated: October 14, 2015 18:22 IST2015-10-13T23:21:52+5:302015-10-14T18:22:52+5:30
घरोघरी घटस्थापना : यात्रोत्सवाला पहिल्याच दिवशी अलोट गर्दी

नवरात्रोत्सवामुळे अवतरले चैतन्य!
नाशिक : आदिशक्तीचे उपासनापर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाला मंगळवारी अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. घरोघरी उत्साहात घटस्थापना करण्यात आली. यंदा नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार आल्याने भाविकांनी ग्रामदैवत कालिकामातेसह शहरातील देवीमंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान, चैतन्यपर्वाला प्रारंभ झाल्याने गेल्या पंधरवड्यापासून बाजारपेठेवर असलेली मरगळ झटकून निघाली आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. घरोघरी घटस्थापना करून त्याचे नऊ दिवस पूजन केले जाते. घरातील एक व्यक्ती उपवास करते. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभामुळे मंगळवारी पहाटेपासूनच शहरात लगबग सुरू झाली. दरम्यान, नाशिकचे ग्रामदैवत कालिकामातेच्या मंदिरात सकाळी ६ वाजता अध्यक्ष केशव पाटील, सुभाष तळाजिया, किशोर कोठावळे, विजय पवार, डॉ. प्रताप कोठावळे आदि विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. जयंत प्रभू, किरण पुराणिक, किशोर पुराणिक यांनी पौरोहित्य केले. सकाळी सात वाजता महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते महापूजा, करण्यात आली. उद्या (दि. १४) सकाळी ७ वाजता डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते महाआरती होणार आहे.
दर्शनासाठी रांगा : वाहतूकही केली बंद
यात्रोत्सवामुळे पहिल्याच दिवशी कालिकामाता मंदिर परिसर गजबजून गेला होता. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषत: महिलांचा मोठा सहभाग होता. मंदिर परिसरात खेळणी, खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंची दुकाने थाटली आहेत. सायंकाळी यात्रेत भाविकांची गर्दी झाली होती. मंदिराकडे जाण्याचे रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद केले आहेत. दरम्यान, शहरात सार्वजनिक मंडळांनीही ठिकठिकाणी देवीची प्रतिष्ठापना केली असून, सकाळी मूर्ती नेण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.