हिंदीचे पुस्तक चार महिन्यांनी उपलब्ध
By Admin | Updated: October 11, 2015 21:58 IST2015-10-11T21:57:41+5:302015-10-11T21:58:36+5:30
मोफत : शालेय पाठ्यपुस्तक वाटप योजनेचा ‘विक्रम’

हिंदीचे पुस्तक चार महिन्यांनी उपलब्ध
घनश्याम अहिरे, मालेगाव कॅम्परोड
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तक वाटप योजनेत मालेगाव तालुक्यात आगळा-वेगळा विक्रम नोंदवला आहे. तालुक्याभरात तीन इयत्तांचे हिंदी विषयाचे पुस्तक तब्बल चार महिन्यानंतर विद्यार्थ्यांच्या हाती सोपवण्यात आले आहे.
आॅनलाइन कारभाराची गरुड भरारी घेण्याच्या तयारीत असलेल्या शिक्षण विभागाला पुस्तक नोंदणीत आॅनलाइनेच दणका दिल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रभाषा हिंदीचे पुस्तक सहामाही परीक्षेच्या पूर्वसंध्येला शाळेत पोहचते झाले आहे.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांची क्रमिक पुस्तके वाटप करण्यात येतात. उन्हाळी सुट्टीत याबाबतचे नियोजन करण्यात येते. यू-डायसवरील विद्यार्थी संख्येवरून पुस्तक संख्या नोंदवली जाते. राज्यभर शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवी पुस्तके देण्याचे धोरण आहे.
मालेगाव शिक्षण विभागाकडून इयत्ता ६ वी, ७ वी आणि इयत्ता
८ वीच्या हिंदी विषयाची नोंदणीच वेळेत झाली नाही. शाळाप्रमुखांनी चार महिने पाठपुरावा केल्याने मालेगाव शिक्षण विभागाला उशिराने जाग आली. जुनी पुस्तके वापरण्याचे कामचलावू आवाहन करीत चार महिन्यांनंतर नवी पुस्तके या आठवड्यात शाळा-शाळांत दाखल झाली.
आॅनलाइन पुस्तक मागणी नोंदणीत राष्ट्रभाषा हिंदी विषयाचा
विसर पडल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा येथील शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे. चार महिन्यानंतर पुस्तके अवतरली मात्र त्यातही वाटपात सुसूत्रता नसल्याने काही शाळांना जास्त तर काही शाळांना पटसंख्येपेक्षा कमी पुस्तके पुरवठा करण्यात आली आहे.
आॅनलाइन आणि ई- लर्निंगचे गारुड तालुक्यात उद्गोचर असताना तीन वर्गांचे क्रमिक पुस्तके शाळेत पोहोचत नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. आगामी शैक्षणिक वर्षात या घटनेची दखल घेऊन धोरणाची सुयोग्य अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा पालकवर्गाकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)