सप्तशृंगगडावरील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने काढली अतिक्रमणे
By Admin | Updated: January 25, 2016 22:51 IST2016-01-25T22:51:51+5:302016-01-25T22:51:52+5:30
सप्तशृंगगडावरील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने काढली अतिक्रमणे

सप्तशृंगगडावरील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने काढली अतिक्रमणे
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटन स्थळ समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपआपल्या दुकानापुढील अतिक्रमण व हवाई अतिक्रमण काढून घेतले.
सप्तशृंगगडावर पहिल्या पायरीपासून संपूर्ण गावात ग्रामपंचायतीने गाळे बांधले असून, येथे विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. मात्र अनेकांनी गाळ्यापुढील जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. त्यामुळे भाविकांना पायी चालणेही कठीण होत असल्याने याबाबत भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.
गडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येत असतात. गडावर अनेक व्यापाऱ्यांनी गाळ्यांमध्ये दुकाने थाटली आहेत. मात्र आपलीच विक्री अधिकाधिक व्हावी म्हणून प्रत्येकानेच रस्त्यावर चार ते पाच फुटांपर्यंत अतिक्रमण केले होते.
रस्त्यावर पेढ्याचे दुकान लावून त्यापुढे हार, वेण्या, तेल, पेढे, पूजेचे सामान मांडून ठेवलेले असते. हॉटेल व्यावसायिकही यात मागे नाहीत. अनेक हॉटेल चालकांनी रस्त्यावरच टेबल, खुर्च्या मांडून रस्ता अरुंद केला होता. त्यामुळे भाविकांना ही दुकाने ओलांडून पुढे जाताना कसरत करावी लागायची. पहिली पायरी ते दाजीबा समाधी मंदिर तसेच भवानी चौक ते चांदणी चौक व शिवालय तलाव, उतरत्या पायऱ्याचा मार्ग व अंतर्गत रस्त्यावर चक्क व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे गावातील मुख्य व अंतर्गत रस्ते अरुंद झाले होते. तसेच सहा ते सात फुटांचे पत्र्याचे शेड व पुढे कापड लावून हवाई अतिक्रमण केल्याने सप्तशृंगगडास झोपडपट्टीचे स्वरूप आले होते. आणि ही अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत चालली होती.
सिंहस्थ कुंभमेळ्यात जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी अचानक सप्तशृंगगडास भेट देऊन तेथील अतिक्रमणांबाबत खंत व्यक्त केली व सिंहस्थ कुंभमेळा झाला की ग्रामपंचायतीमार्फत आपापले अतिक्रमण काढून घ्यावे असे सांगितले होते. परंतु व्यापाऱ्यांनी व ग्रामपंचायतीने या प्रकरणाकडे काणाडोळा करीत ‘काही होत नाही’ या आवेषात राहिल्याने अतिक्रमणाची संक्रांत येथील व्यापाऱ्यांवर व ग्रामपंचायतीवर आली.
अतिक्रमण काढून घेण्याचा इशारा व न काढल्यास दंडाची धास्ती यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानापुढील अतिक्रमण व हवाई अतिक्रमण काढून टाकले. त्यामुळे सर्व अंतर्गत रस्त्यांनी मोकळे श्वास घेतले. त्यामुळे मारुती मंदिरापासून ते पहिल्या पायरीची कमान व देवीचे मंदिर स्पष्टपणे दिसू लागले आहे. परंतु पाच ते सात फूट ग्रामपंचायतीची इमारतच पुढे आल्याने कमानीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण काढल्याने स्वच्छ व सुंदर असे गड दिसू लागल्याने गडाचे रूपच पालटल्याचे भाविकांमध्ये बोलले जात आहे. तसेच मोठमोठे रस्ते दिसू लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये आपणच किती अतिक्रमण केले होते याची त्याची त्यांनाच जाण होत आहे.