आरटीओतील स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र कार्यान्वित
By Admin | Updated: October 17, 2015 22:00 IST2015-10-17T21:57:47+5:302015-10-17T22:00:27+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालय : ४४ व्यावसायिक वाहनांची तपासणी

आरटीओतील स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र कार्यान्वित
नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयात काही महिन्यांपूर्वीच देशातील पहिले संगणकीय स्वयंचलित वाहन चाचणी व परीक्षण यंत्र बसविण्यात आले होते़ आतापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या केंद्राचे काम बुधवारपासून (दि.१४) नियमितपणे सुरू झाले़ पहिल्याच दिवशी या केंद्रातून ४४ व्यावसायिक वाहनांची तपासणी करण्यात आली. या वाहनांपैकी ७५ टक्के वाहने ब्रेक व प्रदूषण तपासणीत उत्तीर्ण झाली, तर बरीच वाहने हेडलाईटमध्ये अनुत्तीर्ण झाली़ व्यावसायिक वाहनांच्या तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या या केंद्रात संगणकीय पद्धतीने वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार
आहे़
या केंद्रामध्ये रिक्षा, हलक्या वजनाची वाहने, डबल एक्सल व बस, ट्रक यांसारख्या अवजड वाहनांची चाचणी करण्यात येणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण, ब्रेक, हेडलाईट, वेग , स्टेअरिंगमधील प्ले तपासला जाणार आहे. तर मोटार वाहन विभागातर्फे वाहनाची बाह्य तपासणी केली जाते़ या केंद्राच्या तपासणीत पास होणाऱ्या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार आहे़ प्रादेशिक परिवहन केंद्रामधील या केंद्रामध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत सुमारे शंभर वाहनांची तपासणी करण्याचे नियोजन आहे.
या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश मंडोरा, भरत कळसकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सुदाम सूर्यवंशी आदिंसह अधिकारी, कर्मचारी व वाहनमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)