लेखकांनी भिंतीपलीकडचे जग पाहावे
By Admin | Updated: October 3, 2015 23:23 IST2015-10-03T23:22:56+5:302015-10-03T23:23:51+5:30
विश्वास पाटील : देशमुख यांच्या ‘झेरॉक्स’, ‘सिंगल’ पुस्तकांचे प्रकाशन

लेखकांनी भिंतीपलीकडचे जग पाहावे
नाशिक : लेखकांनी नेहमी भिंतीपलीकडचे जग पाहायला हवे, कुंपणापलीकडे धाव घ्यायला हवी. जे लेखक डोळसपणे समाजात वावरतात, त्यांचे लेखन अनुभवातून येते. त्यामुळे ते सच्चे असते, असे प्रतिपादन प्रख्यात लेखक विश्वास पाटील यांनी केले.
मानसी देशमुख लिखित आयकॉन प्रकाशनाच्या ‘झेरॉक्स’ या कथासंग्रहाचे व ‘सृजन संवाद’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन कुसुमाग्रज स्मारकात आज झाले, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून पाटील बोलत होते. ज्येष्ठ लेखक ह. मो. मराठे, साहित्यिक सुमेध रिसबूड (वडावाला), डॉ. जयंत वाघ, ‘लोकमत’च्या ठाणे व पालघर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी, आयकॉन पब्लिकेशन्सचे मनोज वरंदळ व्यासपीठावर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, नव्या लेखकांच्या साहित्यातून बऱ्याचदा हाती फारसे काही लागत नाही; मात्र देशमुख यांची कथा ताकदीची आहे. मेघना पेठे यांनी जशी नव्या अनुभवांची, नव्या स्त्रीची कथा मराठी साहित्यात आणली, त्या दिशेनेच देशमुख यांनी पुढचे पाऊल टाकले आहे. लेखनात सच्च्या अनुभवाबरोबरच सच्ची भाषा येते, तेव्हा त्यात काही अश्लील वाटत नाही. कलावंतांनी कौतुक करणाऱ्या माणसांच्या घोळक्यात राहण्याऐवजी आहे त्यापेक्षा अधिक चांगले कसे करता येईल, याचा प्रयत्न करीत राहावा. आपली ‘पांगिरा’ कादंबरी प्रचंड गाजली; मात्र त्यामागचे रहस्य वेगळेच आहे. दिनकर गांगल व अरुण साधू यांनी या कादंबरीचे हस्तलिखित वाचून त्यात काही दुरुस्त्या सुचवल्या. त्यामुळे ही कादंबरी आपण नव्याने लिहिली व त्यानंतर ती यशस्वी झाली. लेखकाने नेहमी श्रेष्ठ साहित्य घडवण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात सुमेध वडावाला (रिसबूड) यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मानसी देशमुख यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. नंदकुमार टेणी यांनी सूत्रसंचालन केले.