फुले महामंडळाच्या स्थितीकडे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2015 21:45 IST2015-10-19T21:44:51+5:302015-10-19T21:45:42+5:30
भीमशक्ती संघटना : आर्थिक मदतीची मागणी

फुले महामंडळाच्या स्थितीकडे वेधले लक्ष
नाशिकरोड : मागासवर्गीयांच्या आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची ढासळलेली आर्थिक स्थिती व प्रशासनाकडून लाभार्थ्यांची होणारी अडवणूक दूर करण्यासाठी लक्ष घालावे, या मागणीचे निवेदन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना देण्यात आले.
भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने बडोले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ प्रशासन व बॅँकांकडून सुशिक्षित बेरोजगारांची विनाकारण अडवणूक केली जात आहे. त्यामुळे मागासवर्गीय बेरोजगारांचा आर्थिक विकास खुंटला आहे. गेल्या सात वर्षांपासून निधी उपलब्ध न झाल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित आहे. महामंडळातील त्रुटीचे उच्चाटन करून वेळीच उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात महामंडळाला टाळे लागण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांना अपेक्षित कर्जापेक्षा अत्यंत कमी रकमेचे कर्ज मंजूर करण्यात येते. त्यामुळे संबंधित लाभार्थ्याला कुठलाही फायदा होत नाही. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कर्ज प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्याची बॅँक प्रशासनाकडून विविध कारणास्तव अडवणूक केली जाते. महामंडळाच्या नाशिक कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कर्ज प्रकरणे, प्रस्ताव पुढे सरकत नाही. यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महामंडळाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश पवार, सिद्धार्थ लोखंडे, राजू पवार, तुषार उन्हवणे, भाऊराव वानखेडे, मनोज उन्हवणे आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)