दुरंगी लढतीकडे भगूरवासीयांचे लक्ष
By Admin | Updated: November 16, 2016 23:21 IST2016-11-16T23:17:27+5:302016-11-16T23:21:17+5:30
दुरंगी लढतीकडे भगूरवासीयांचे लक्ष

दुरंगी लढतीकडे भगूरवासीयांचे लक्ष
भगूर : येथील प्रभाग क्र. ६ अ हा ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. या प्रभागात भाजपाला उमेदवार मिळाला नसल्याने येथे दुरंगी लढत होत आहे. अति उच्चशिक्षित आणि सामान्य शिक्षित अशा दोन माहिलांमध्ये लढत आहे. जातीय समीकरण आणि पतिराजाच्या समाजसेवेवर विजयाचे गणित चालणार आहे.
प्रभाग ६ अ मध्ये राममंदिर रोड, जैनभवन, बलकवडे पतसंस्था, यादव यांच्या घरापासून नाल्यापर्यंतचा परिसर येतो. या प्रभागाची मतदार संख्या १३०७ एवढी असून, येथे तेली, मराठा, माळी, शिंपी, वंजारी, तर काही प्रमाणात मुस्लीम समाजाचेही मतदार आहेत. येथून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे प्रेरणा विशाल बलकवडे आणि शिवसेनेकडून मनीषा कस्तुरे नशीब आजमावत आहेत. भाजपाला येथे उमेदवार मिळाला नाही. आघाडीच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे यांनी लंडन येथील युनिर्व्हसिटीमधून बी. ई. कॉम्प्युटर इंजिनिअरची पदवी प्राप्त केली आहे. त्या गावातील सर्वात उच्चशिक्षित आहे असे मानले जात आहे. सध्या त्या राईस मिल व प्रिवील्ड व्होअर सोल्यूशन कंपनीच्या उद्योजक आहेत. त्या नाशिक जिल्हा राष्ट्रवादी महिला युवतीच्या जिल्हाप्रमुख असून त्यांंनी अनेक आंदोलने, समाजसेवेची कामे केलेली असून, त्यांचे पती विशाल बलकवडे आंतर राष्ट्रीय कुस्तीप्रेमी, समाजसेवक आहेत. प्रेरणा बलकवडे यांना वडिलांकडूनच राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्दुसऱ्या उमेदवार मनीषा अंबादास कस्तुरे या गृहिणी असून, यांचेही शिक्षण बऱ्यापैकी झालेले आहे. तसा त्यांना स्वत:चा राजकीय वारसा नाही. परंतु मनमिळावू, सर्वांना सहकार्य करणाऱ्या म्हणून त्यांची प्रभागात ओळख आहे. त्यांचा राजकीय वारसा म्हणजे त्यांचे पती अंबादास कस्तुरे हे भगूर शिवसेनेचे शहराध्यक्ष असून, विद्यमान नगरसेवकही आहेत. राजकारणात त्यांचा चांगला दबदबा आहे. (वार्ताहर)