पक्षप्रमुखांच्या निर्णयाकडे सेनेचे लक्ष
By Admin | Updated: January 13, 2017 01:03 IST2017-01-13T01:03:03+5:302017-01-13T01:03:18+5:30
युतीबाबत संभ्रम : पुढच्या आठवड्यात घडामोडी

पक्षप्रमुखांच्या निर्णयाकडे सेनेचे लक्ष
नाशिक : महापालिका निवडणुकांसाठी भाजपासोबत युती करण्याबाबत सेना नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नाशिकसाठीही ही युती होईल की नाही याकडे सेनेच्या इच्छुकांचे लक्ष लागून असून, युती झाल्यास होणाऱ्या फायद्या-तोट्याचा विचार करतानाच, उमेदवारी धोक्यात येण्याची भीतीच अधिक व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणार असल्याचे गृहीत धरून राजकीय पक्षांनी डिसेंबरअखेरपासून जोमाने तयारीला सुरुवात करून इच्छुकांचे ताबूत गरम केले, त्यातच निवडणुकीत कोणाबरोबर युती वा आघाडी होणार नाही, असे सांगून स्वबळाचे नारे दिले. त्यामुळे प्रत्यक्षात निवडणुकीत उमेदवारी आपल्यालाच मिळेल असे स्वप्न पाहणाऱ्यांच्या संख्येत भर पडली. मात्र निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांकडून आघाडी व युतीच्या भाषा होऊ लागल्याने इच्छुकांची धडकन वाढू लागली आहे. भारतीय जनता पार्टीने मुंबई व ठाण्यासाठी सेनेबरोबर युती करण्याची तयारी दर्शविल्याने सेनेनेही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला, मात्र युती करायचीच असेल तर ठाणे, मुंबईपुरती नको, तर संपूर्ण राज्यातच व्हावी, असे अशी भूमिका सेनेने घतेली आहे. त्यापार्श्वभूमीवर नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपासोबत युती होईल की नाही यावर गुरुवारी दिवसभर सेनेच्या इच्छुकांमध्ये चर्चा झडली. युती झाल्यास जागावाटप कसे असेल, कोणता प्रभाग कोणाला सुटेल, आरक्षित जागेवर उमेदवार कोण अशा विषयांवर आडाखे बांधण्यात आले. (प्रतिनिधी)