सेना-आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष

By Admin | Updated: March 9, 2017 02:13 IST2017-03-09T02:12:46+5:302017-03-09T02:13:00+5:30

नाशिक : नाशिक महापालिकेत महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि मनसे यांची नेमकी काय भूमिका असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

Attention to the military-led role | सेना-आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष

सेना-आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक : मुंबई महापालिकेत भाजपाने शिवसेनेला दिलेला पाठिंबा, कॉँग्रेसने उमेदवार देऊन पार पाडलेली औपचारिकता, मनसेची गैरहजेरी आणि राष्ट्रवादीची तटस्थता यामुळे नाशिक महापालिकेत महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि मनसे यांची नेमकी काय भूमिका असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. ९) सकाळी ११ ते २ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
नाशिक महापालिकेत भाजपाने ६६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले असल्याने भाजपाचाच महापौर-उपमहापौर बसणार हे निश्चित आहे. फक्त, महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध होते किंवा नाही, एवढीच औपचारिकता बाकी आहे. मुंबई महापालिकेत भाजपाने उमेदवार न देता शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. ठाणे येथेही भाजपाने उमेदवार न देता सेनेचा उमेदवार बिनविरोध निवडून दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये बहुमतात असलेल्या भाजपाच्या विरोधात शिवसेनेकडून उमेदवार न दिला जाण्याचीच शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, उमेदवार द्यायचा की नाही, याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील असा पवित्रा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मात्र निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचे ठरविले आहे. मुंबईत कॉँग्रेसने महापौरपदासाठी उमेदवार दिला होता. त्यामुळे नाशिकमध्येही कॉँग्रेसकडून महापौरपदासाठी उमेदवार दिला जाणार असून त्यांच्याकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेल्या एकमेव नगरसेवक आशा तडवी यांचा अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातून राष्ट्रवादीकडे उमेदवारच नसल्याने राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी सुषमा पगारे, समीना मेमन, शोभा साबळे यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली जाऊ शकते. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीप्रसंगी मनसेचे सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे मनसेकडून मुंबईचाच कित्ता नाशिकमध्येही गिरविला जाण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातच मनसेकडून भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला जाण्याचीही चर्चा आहे. तीन अपक्षांपैकी एक कॉँग्रेस पुरस्कृत आहे. त्यामुळे अन्य दोन्ही अपक्षांचा कुणाला पाठिंबा मिळतो याकडे लक्ष लागून असले तरी तीनही अपक्षांसह एकमेव रिपाइं सदस्याची सत्ताधारी भाजपाला साथ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Attention to the military-led role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.