इच्छुकांचे नगराध्यक्ष आरक्षणाकडे लक्ष

By Admin | Updated: September 25, 2016 23:52 IST2016-09-25T23:51:23+5:302016-09-25T23:52:00+5:30

थेट जनतेतून निवड : येवल्यात राजकीय पक्षांचे आडाखे सुरू

Attention to the mayor of the interested reservation | इच्छुकांचे नगराध्यक्ष आरक्षणाकडे लक्ष

इच्छुकांचे नगराध्यक्ष आरक्षणाकडे लक्ष

येवला : येवला पालिकेची निवडणूक आगामी साडेतीन महिन्यांवर येऊन ठेपली असून, राज्य शासनाने यापूर्वीच द्विसदस्यीय प्रभाग पद्धती आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय कायम असल्याने विविध राजकीय पक्षांचे आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या संवर्गासाठी राहते यावर निवडणुकीचा फड गाजणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार याबाबतची चर्चा शनिवारपासून सोशल मीडियावर पुन्हा सुरू झाल्याने पालिकेच्या निवडणुकीच्या चर्चेचा विषय रंगत आहे. वॉर्डनिर्मिती झाली असली तरी नगराध्यक्षपदासाठी कोणते आरक्षण पडते याची इच्छुकांना प्रतीक्षा आहे. यंदा प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा सुरू केली आहे. किंबहुना आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष असावा यासाठी तयारीला लागा असा संदेश असल्याचे अनेक कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवत आहेत. आगामी पंधरा दिवसांत नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने वातावरणात रंग भरण्यास सुरुवात होईल. स्वबळाच्या भाषेचा विचार केला तर येवल्यात प्रमुख असलेल्या चार पक्षांचे उमेदवार रिंगणात असणार हे नक्की आहे.
सर्वात अगोदर भाजपाने नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. येथील विश्रामगृहावर भाजपाने बैठकीचे आयोजन केले होते. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पैशावाल्याला तिकीट नाही म्हणत गल्लीतच तिकिटे मिळतील, दिल्लीत नाही असे सूतोवाच करून कार्यकर्त्यांची नस ओळखली परंतु भाजपाला नव्यानेच माजी आमदार कल्याणराव पाटील यांचे नेतृत्व मिळाले आहे. त्यांनी सन २००१ ची पालिकेची निवडणूक हाताळली आहे. भाजपाला नवे बळ मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्याचे दिसते. दुसरीकडे सेनेने अद्याप आपला पत्ता उघड केला नसला तरी शिवसेनेचे विधानसभा उमेदवार संभाजी पवार व शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हा बँक चेअरमन नरेंद्र दराडे आणि जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांनादेखील शिवसेनेचा नगराध्यक्ष येवल्यात होऊ शकतो हे दाखवायचे असल्यास नवल वाटायला नको. राष्ट्रवादी कॉँग्रेस तर येवल्यात प्रस्थापित आहे. येवला पालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे १६, भाजपा ३, कॉँग्रेस १, सेना १, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. दि. ३ आॅक्टोबर रोजी नाशिक येथे भुजबळ समर्थनार्थ होत असलेला निषेध मोर्चा या पालिकेच्या निवडणुकीलादेखील वेगळे वळण देतो काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
येवला शहराची लोकसंख्या ४९ हजार ८२६ असून, नव्याने झालेल्या द्विसदस्यीय प्रभागामुळे येवला पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभागांची संख्या २४ झाली आहे. यंदा ५० टक्के राखीव धोरणातही १२ पुरु ष व १२ महिला पालिकेत प्रतिनिधित्व करतील. पण नगराध्यक्षपदाचा दोर ज्या पक्षाच्या हातात राहील त्यांना विकासकामे करण्याची संधी राहणार आहे. त्यामुळे आता स्वबळाची भाषा होऊ लागली आहे. येवल्यात तीन वेळा जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला आहे.
येवला पालिकेच्या १२ प्रभागाच्या मतदार याद्या सोमवार, दि. २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, ७ आॅक्टोबरपर्यंत या मतदार याद्यांबाबत हरकती घेता येतील. त्यानंतर १५ आॅक्टोबर रोजी अंतिम याद्या प्रसिद्ध होणार आहेत. (वार्ताहर)
सर्वांना समान संधी
येवला पालिकेत महिलांचे संख्यानिहाय प्राबल्य अधिक असल्याने राष्ट्रवादीने सर्वात प्रथम महिलेला नगराध्यक्षपदाचा मान दिला. सर्वांना समान संधी देण्याच्या न्यायाने दोन महिला, दोन पुरु षांना नगराध्यक्षपदाची संधी दिली. यातही शहरातील मुख्य क्षत्रिय, गुजराथी, मुस्लीम, माळी समाजाला नगराध्यक्षपदाची संधी दिली. पालिकेच्या मुदतीच्या अखेरच्या टप्प्यात आमदार भुजबळ अडचणीत आल्याने अंतिम टप्प्यात नगराध्यक्ष बदलाची हालचाल मंदावली.

Web Title: Attention to the mayor of the interested reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.