बदल्यांच्या भानगडीतून अंग काढण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: August 27, 2016 00:11 IST2016-08-27T00:10:54+5:302016-08-27T00:11:05+5:30
आयुक्तांनी अहवाल मागविला : अधिकारी माघारी

बदल्यांच्या भानगडीतून अंग काढण्याचा प्रयत्न
नाशिक : उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्यांच्या प्रकरणात नको तितका घेतलेला रस अंगलट येऊ पाहताच, वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी हात झटकण्यास सुरुवात केली असून, विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून बदली व रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचे अहवाल मागवून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न केला, तर जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत, रुजू होण्यास आलेल्या अधिकाऱ्याला पुन्हा माघारी पाठवून देत स्वत: रजेवर निघून जाणे पसंत केले आहे. दोन दिवस शासकीय सुट्या आल्यामुळे आता सोमवारीच काय तो फैसला होण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नको तितका हस्तक्षेप केल्यामुळे आठ दिवस उलटूनही बदल्या झालेले अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू होऊ शकले नाहीत, तर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना रुजू करून घेण्यात येत नसल्यामुळे गोंधळ माजला आहे. चुकीच्या बदल्यांच्या विरोधात मॅटमध्ये जाऊन बदलीला स्थगिती मिळवून आणलेल्या अधिकाऱ्यांनाही रुजू करून घेण्यात येत नसल्याने मॅटच्या आदेशाचा भंग होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.