शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:23 IST2021-05-05T04:23:40+5:302021-05-05T04:23:40+5:30
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखली झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषिमंत्री भुसे ...

शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचे प्रयत्न
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखली झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषिमंत्री भुसे दूरदृश्यप्रणालीद्वारे मालेगाव येथून बोलत होते. बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ.भारती पवार, आमदार सर्वश्री किशोर दराडे, नरेंद्र दराडे, दिलीप बनकर, दिलीप बोरसे, सरोज अहिरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
कृषिमंत्री भुसे यावेळी म्हणाले येणाऱ्या खरीप हंगामात जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी ‘एक गाव एक वाण’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर खते व बियाणांचे वाटप करण्याच्या मोहिमेला गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने, शेतकऱ्यांना बांधावर खतांचे वाटप करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कृषी योजनांमध्ये महिलांनी सहभाग घेतल्यास त्याचा अधिक फायदा होतो, त्या अनुषंगाने महिलांना कृषीविषयक आधुनिक प्रशिक्षण देण्यात येऊन कृषी योजनांमध्ये ३० टक्के महिलांना प्राधान्य देण्यात सोबतच अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनाही कृषी योजनांचा योग्य लाभ मिळण्यासाठी त्यांच्या आवश्यक माहितीचे संकलन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल योजना यशस्वीपणे राबविण्यात आली असून, या योजनेसही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कडक निर्बंधांच्या काळात कृषिपूरक व्यावसायांच्या दुकानांना मुभा देण्यात यावी, अशी मागणी कृषिमंत्री भुसे यांनी योवळी केली. विधानसभा उपाध्यक्ष नररी झिरवळ म्हणाले, जिल्ह्याच्या आदिवासी भागातील शेतकरी आंबा, मशरूम, स्ट्रॉबेरी अशा विविध फळांची शेती करीत आहेत. या अनुषंगाने कृषी विभागाने या शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिके व त्यांच्या उत्पादनाच्या वाढीच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करण्यात यावे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ.भारती पवार, आमदार दिलीप बनकर, दिलीप बोरसे, किशोर दराडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरसाठ यांनी सादरीकरणाद्वारे कृषी विभागाने जिल्ह्यात केलेल्या कामांची व खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाची माहिती सादर केली बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक के.एस. शिरसाठ आदी उपस्थित होते.
कोट -
जनतेला अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
- छगन भुजबळ, पालकमंत्री .