बनावट धनादेश देऊन गंडा घालण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: January 21, 2016 22:31 IST2016-01-21T22:30:38+5:302016-01-21T22:31:56+5:30

बनावट धनादेश देऊन गंडा घालण्याचा प्रयत्न

Attempts to add fake checks | बनावट धनादेश देऊन गंडा घालण्याचा प्रयत्न

बनावट धनादेश देऊन गंडा घालण्याचा प्रयत्न

नाशिक : येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे असलेल्या धनादेशाप्रमाणे बनावट धनादेश करून सुमारे तीन लाख ८० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न फसला आहे. व्यावसायिकाच्या जागरूकतेमुळे धनादेश वटला गेला नसला तरी थेट बनावट धनादेश बनविण्यापर्यंत मजल जाऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे.
नाशिक येथील पाथर्डी फाटा येथील अनुराग अर्बन टेक इन्फ्रा लि. कंपनीचे संचालक शशिकांत गोरखनाथ बोरसे यांच्याबाबत हा प्रकार घडला असून, त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. बोरसे यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. स्टेट बॅँक आॅफ इंडियाची शिंगाडा तलाव शाखा आहे. तेथून ते वेळोवेळी देयके देत असतात. दरम्यान, गेल्या मंगळवारी (दि.१९) त्यांच्या मोबाइलवर धनादेश क्रमांक ९८९२४३ हा वटविण्यासाठी आला असल्याचा मेसेज आला. त्यावर तीन लाख ७९ हजार ४३७ रुपये अशी इतकी रक्कम देय होती.
तथापि, या रकमेचा धनादेश कोणाला दिला तर नाहीच उलट त्या क्रमांकाचा कोरा धनादेशही त्यांच्याकडेच होता. बोरसे यांनी तातडीने स्टेट बॅँकेत जाऊन हा प्रकार कथन करून रक्कम थांबविण्याचे पत्र दिले. त्यांच्या या पत्रामुळे दुसऱ्या खात्यावर वर्ग केलेली रक्कम पुन्हा बोरसे यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. बोरसे यांनी तातडीने कार्यवाही केल्याने त्यांची फसवणूक टळली असली तरी त्यांच्याकडे असलेल्या धनादेशाची हुबेहूब नक्कल करून त्यावर बोरसे यांची स्वाक्षरी करून तो धनादेश स्टेट बॅँक आणि त्रावणकोर या बॅँकेमार्फत स्टेट बॅँक आॅफ इंडिया चेन्नई येथील क्लिअरिंग हाऊसकडे पाठविल्याचे आढळले आहे. त्यामुळे बनावट धनादेश देणाऱ्या या गुन्हेगाराचा शोध घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शशिकांत बोरसे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे. अर्थात, पोलीस ठाण्यात यासंदर्भात अर्ज दाखल केला असला तरी त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Attempts to add fake checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.