सीबीएसवर रिक्षाचालकाचा रिक्षा पेटविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: April 2, 2017 22:23 IST2017-04-02T22:23:05+5:302017-04-02T22:23:05+5:30
फ्रंट सिट वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकास शहर वाहतूक पोलिसाने कारवाईसाठी थांबविले असता चालकाने डिक्कीतील पेट्रोल काढून रिक्षावर टाकून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना

सीबीएसवर रिक्षाचालकाचा रिक्षा पेटविण्याचा प्रयत्न
नाशिक : फ्रंट सिट वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकास शहर वाहतूक पोलिसाने कारवाईसाठी थांबविले असता चालकाने डिक्कीतील पेट्रोल काढून रिक्षावर टाकून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि़१) दुपारच्या सुमारास सीबीएस सिग्नलजवळ घडली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संबंधित रिक्षाचालकाच्या विरोधात मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहर वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई ढाकणे हे सीबीएस सिग्नलवर कर्तव्यावर होते़ यावेळी फ्रंट सिट वाहतूक करणारा एमएच १५, इएच ३३६१ वरील रिक्षाचालक रिझवान कादीर शेख (३७, जगतापवाडी, स्वारबाबानगर, सातपूर) यास अडविले़ तेव्हा त्याने माझ्या दोन रिक्षा जमा केल्या आहेत, त्यामुळे मी खूप मानसिक टेन्शनमध्ये आहे, असे म्हणून ढाकणे यांना कारवाई करण्यास मज्जाव केला़ यानंतर ढाकणे यांना मी तुम्हाला दाखवितो असे म्हणत रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना उतरवून डिक्कीत ठेवलेली पेट्रोलची बाटली काढून रिक्षावर पेट्रोल ओतले़ यानंतर रिक्षा पेटवून देण्यासाठी आगपेटी शोधू लागला़
सीबीएस सिग्नलवर असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी व रिक्षाचालक यांच्यामध्ये सुरू असलेल्या या वादावादीत अचानक रिक्षाचालकाने घेतलेल्या पावित्र्यामुळे खळबळ निर्माण झाली होती़ तर पोलिसांनी वेळीत शेख यास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला़ याप्रकरणी ज्वालाग्रही पदार्थाबाबत हयगयीने कृती करून सार्वजिनिक ठिकाणी रस्त्यावर इतरांच्या जीवितास तसेच व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण होईल, अशी कृती केल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़