छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:20 IST2017-08-23T23:48:58+5:302017-08-24T00:20:25+5:30
बेकायदेशीर मद्यविक्री सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना कारवाई केल्यास आत्महत्येची धमकी देऊन शिवीगाळ करून हल्ला केल्याची घटना सातपूरच्या महादेववाडीमध्ये मंगळवारी (दि़२२) सायंकाळी घडली़

छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला
नाशिक : बेकायदेशीर मद्यविक्री सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना कारवाई केल्यास आत्महत्येची धमकी देऊन शिवीगाळ करून हल्ला केल्याची घटना सातपूरच्या महादेववाडीमध्ये मंगळवारी (दि़२२) सायंकाळी घडली़ सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेववाडीतील एका घरात बेकायदेशीर मद्यविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता मद्याचा मोठा साठा आढळून आला़ त्यामुळे पंचनामा सुरू असताना संशयित चित्रा महेंद्र साळवे, बाळा ऊर्फ महेंद्र प्रल्हाद साळवे व कृष्णा शिवाजी जाधव (रा. महादेववाडी, सातपूर) यांनी पोलिसांना कारवाई केल्यास आत्महत्येची तसेच छेडखानी केली म्हणून फिर्याद देण्याची धमकी दिली़ तसेच पोलिसांना शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला केला़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे़
राज्यात पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांप्रमाणेच नाशिकमध्येही पोलीसांना लक्ष्य केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच वाहतूक पोलिसाला एका महिलेसह तिच्या पतीने मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात दोघांनाही न्यायालयाने शिक्षा सुनावली होती.