मनसेचा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हल्लाबोल

By Admin | Updated: July 24, 2014 00:57 IST2014-07-23T23:56:11+5:302014-07-24T00:57:54+5:30

‘आयुक्त दो’ : महापालिका प्रवेशद्वार केले बंद, अधिकारी-कर्मचाऱ्यांना रोखले; विभागीय आयुक्तांना निवेदन

Attack against MNS Chief Minister | मनसेचा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हल्लाबोल

मनसेचा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हल्लाबोल

नाशिक : चार महिने झाले तरी महापालिकेला नूतन आयुक्त मिळत नसल्याने राज्यातील आघाडी सरकार विशेषत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राजकारण करून मनसेला अडचणीत आणत असल्याचा आरोप करीत मनसे नगरसेवकांनी हल्लाबोल केला. पालिकेचे प्रवेशद्वार बंद करून अधिकारी-कर्मचाऱ्यांना रोखले. सुमारे एक ते दीड तास प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. त्यानंतर आधी प्रभारी आयुक्त आणि नंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, आठ दिवसांत नूतन आयुक्त न नेमल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पालिकेत पूर्णवेळ आयुक्त नसल्याने मूलभूत सुविधा आणि विकासकामे ठप्प झाली आहेत. मनसेकडून वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. कुंभमेळ्यासाठी निधी दिला जात नाही तसेच एलबीटीअंतर्गत थकलेला तीनशे कोटी रुपयांचा निधी शासन देत नाही, अशी मनसेची तक्रार आहे. नगरसेवकांनी सुचवलेली दोन-दोन लाख रुपयांची कामे होत नसल्याने अखेरीस बुधवारी सकाळी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. सकाळी रामायण येथे नगरसेवक जमा झाले. तेथून ते राजीव गांधी भवन येथे आले आणि तेथेच प्रवेशद्वार बंद करून आंदोलन सुरू केले. ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘आघाडी सरकारचा धिक्कार असो’, आयुक्त न देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. विशेष म्हणजे, पालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसल्याने कामेच होत नसतील तर पालिकेत कशाला जाता, असा प्रश्न करीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही बराच वेळ मज्जाव करण्यात आला. त्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला.
सदरचे आंदोलन सुरू केल्यानंतर काही वेळाने महापौर अ‍ॅड. यतिन वाघ तसेच सभागृह नेता शशिकांत जाधव, शहराध्यक्ष तथा स्थायी समिती सभापती राहुल ढिकले, माजी गटनेत्या सुजाता डेरे यांनी प्रभारी आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची भेट घेतली आणि कैफीयत मांडली. त्याचबरोबर कामे ठप्प झाल्याची तक्रार केली. तथापि, कामे ठप्प झाल्याचा इन्कार आयुक्तांनी केला आणि आवश्यक ती कामे होत असल्याचा दावा केला. त्यानंतर सदरचे निवेदन येथे देऊन उपयुक्त ठरणार नाही हे लक्षात आल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे निवेदन देण्याचे ठरवण्यात आले. प्रवेशद्वारावर सभागृह नेता शशिकांत जाधव आणि गटनेता अशोक सातभाई यांच्यासह नगरसेवक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Attack against MNS Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.