पांगरी येथील एटीएम बंद
By Admin | Updated: February 6, 2016 22:36 IST2016-02-06T22:35:58+5:302016-02-06T22:36:48+5:30
पांगरी येथील एटीएम बंद

पांगरी येथील एटीएम बंद
पांगरी : येथील इंडियन ओव्हरसीज बॅँकेने सुरू केलेले एटीएम महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. या भागातील एटीएम तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राष्ट्रीयीकृत बॅँक असल्याने परिसरातील सर्वच व्यावसायिक आर्थिक व्यवहारासाठी याच बॅँकेला पसंती देतात. ग्राहकांची गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन बॅँकेने याठिकाणी दोन महिन्यांपूर्वीच एटीएम सुविधा सुरू केली होती. सिन्नर-शिर्डी मार्गालगत असलेल्या या एटीएम केंद्रास ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने बॅँकेतून पैसे काढणाऱ्या ग्राहकांची गर्दी कमी होऊन बॅँकेवरीलही कामाचा ताण निवळला होता. तथापि, सदर एटीएमसाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ची जोडणी उपलब्ध नसल्याने खासगी कंपनीचे इंटरनेट वापरले जात आहे. या इंटरनेटला वेग नसल्याने एटीएमची प्रक्रिया अत्यंत संथपणे चालत आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच डळमळीत चालू झालेले एटीएम मशीन महिनाभरापासून बंद अवस्थेतच आहे.
पैसे काढण्यासाठी नागरिकांना बॅँकेचाच आधार घ्यावा लागत असल्याने सदर तांत्रिक अडचण दूर करून एटीएमची सेवा तातडीने २४ तासांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांसह पायी जाणाऱ्या साईभक्तांनी केली आहे. (वार्ताहर)