धावपटू कविता राऊत करणार मतदार नोंदणीसाठी आवाहन
By Admin | Updated: September 7, 2016 00:43 IST2016-09-07T00:42:13+5:302016-09-07T00:43:01+5:30
मनपा निवडणूक : जनजागृती मोहिमेत सहभाग

धावपटू कविता राऊत करणार मतदार नोंदणीसाठी आवाहन
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून दि. १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत विशेष मतदार नोंदणी पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून, त्यात मतदार नोंदणीसाठी सावरपाडा एक्स्प्रेस व आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू कविता राऊत आवाहन करणार आहे. महापालिकेच्या विनंतीनुसार मतदार जनजागृती मोहिमेत कविता राऊतने सहभागी होण्यास संमती दिल्याने आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या हस्ते राऊतचे स्वागत करण्यात आले.
फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू असतानाच मनपातर्फे मतदार जागृती मोहीमही राबविली जाणार आहे. दि. १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या व्यक्तीस मतदार म्हणून नाव नोंदविता येणार आहे. सदर निवडणुकीत मतदान करण्यासाठी विधानसभेच्या मतदार यादीत नाव असणे आवश्यक
आहे.
महापालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या मतदार जागृती अभियानासाठी धावपटू कविता राऊत यांना प्रसिद्धी कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार राऊत यांनी सक्रिय सहभागी होण्यास संमती दर्शविली आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत प्रसिद्ध होणारी पत्रके, बॅनर्स यावर कविता राऊतची प्रतिमा झळकणार आहे. मतदार जागृतीसाठी कविता राऊत यांनी संमती दिल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रशासन उपआयुक्त विजय पगार, क्रीडा अधिकारी यशवंत ओगले, कविताचे पती महेश तुंगार आदि उपस्थित होते.
सध्या गणेशोत्सवाची धामधूम असल्याने नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लक्षात घेता महापालिकेमार्फत मतदारांना आवाहन करणारे बॅनर्स मंडळांच्या मंडपासमोर लावण्यात येत
आहेत, शिवाय ध्वनिफितींद्वारेही मतदारांना आवाहन केले जात आहे. (प्रतिनिधी)