दमा आजार आता अत्याधुनिक उपचारांमुळे सुसह्य
By Admin | Updated: May 5, 2015 01:37 IST2015-05-05T01:36:37+5:302015-05-05T01:37:16+5:30
दमा आजार आता अत्याधुनिक उपचारांमुळे सुसह्य

दमा आजार आता अत्याधुनिक उपचारांमुळे सुसह्य
नाशिक : काही वर्षांपूर्वी असाध्य असणारा दमा (अस्थमा) आजार आता अत्याधुनिक उपचारांमुळे सुसह्य ठरू लागला आहे. अधिक काळपर्यंत प्रभावी ठरू शकणारी औषधे गेल्या वर्षभरात बाजारात दाखल झाली आहेत. तथापि, सततच्या वाढणाऱ्या प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांत मात्र वाढ होत असल्याचे चित्र आहे. भल्याभल्यांची गाळण उडवणारा दमा हा आजार नियंत्रणात आणणे, हे पूर्वी अत्यंत जिकिरीचे काम होते. श्वास घेण्यास त्रास होणे, बोलताना धाप लागणे ही दम्याची लक्षणे. याचे पर्यावसान दम्याचा अटॅक येण्यापर्यंत होऊ शकते. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी अॅलर्जी असणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे, सतत औषधे घेत राहणे, हाच उपाय होता. दम्यासाठी औषधे उपलब्ध होती; मात्र ती वारंवार घ्यावी लागत होती. गेल्या काही वर्षांत मात्र दम्यावर नियंत्रण ठेवू शकणारी अत्याधुनिक औषधे बाजारात उपलब्ध झाली आहेत. या औषधांमुळे रुग्णांना मोठा दिलासा लाभतो आहे.
‘स्प्रे’चा प्रभाव २४ तास दम्याच्या रुग्णांसाठी पूर्वी उपलब्ध असलेले स्प्रे किंवा पंप हे दर ४ किंवा ६ तासांनी पुन:पुन्हा घ्यावे लागत असत. त्यामुळे घराबाहेर पडताना, कार्यालयीन कामाच्या ठिकाणीही ते खिशात बाळगावे लागत असत. आता मात्र या स्प्रेच्या प्रभावाचा कालावधी १२ ते २४ तासांपर्यंत वाढला आहे. याशिवाय त्यांचा आकारही लहान झाला असून, त्यांच्यात आता महिनाभराचे औषध मावते. (प्रतिनिधी)