सहायक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या
By Admin | Updated: December 31, 2016 23:21 IST2016-12-31T23:20:48+5:302016-12-31T23:21:13+5:30
मुलींच्या शासकीय वसतिगृहातील अधीक्षकाविरोधात विद्यार्थिनींचा एल्गार

सहायक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या
कळवण : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत मानूर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील ९० विद्यार्थिनींनी दमबाजी करणाऱ्या महिला अधीक्षकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी गंगाथरण डी. यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून निवेदन दिले. प्रकल्पाधिकारी गंगाथरण डी. यांनी दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुलींनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. वसतिगृहात पथक पाठवून चौकशी करण्यात आली असून, संबंधित महिला अधीक्षकास नोटीस देण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील मानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या अधीक्षकाविरोधातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीची सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी दखल घेतल्यानंतर शनिवारी कळवण शहराजवळील मानूर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील ९० मुलींनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या मांडून महिला अधीक्षकाविरोधात एल्गार पुकारल्याने आदिवासी प्रकल्प कार्यालयात खळबळ उडाली आहे.
शासनाने कोट्यवधी रु पये खर्च करून मानूर येथे सर्व सुखसुविधायुक्त मुलींचे वसतिगृह बांधले आहे. या वसतिगृहात अधीक्षक राहात नाही. अधीक्षकांचे दुर्लक्ष असल्याने वसतिगृहातील मुली नेहमी आजारी पडतात. मुलींच्या आरोग्याची अधीक्षकांकडून काळजी घेतली जात नसून मुलींच्या आरोग्य व आजाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आजारी मुलींकडून आजारी का पडल्या, याचे लेखी लिहून मागितले जाते. अधीक्षक निर्वाह भत्ता वेळेवर व पूर्ण देत नाही. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी वसतिगृहाला भेट देण्यास आले तर तक्र ारी करू नका, असा दम अधीक्षक देतात. वसतिगृहातील मुलींना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्र ार या मुलींनी केली आहे. (वार्ताहर)