शिक्षण विभाग घेणार सेवानिवृत्तांची मदत : अपुरे मनुष्यबळ
By Admin | Updated: April 2, 2017 21:06 IST2017-04-02T21:06:38+5:302017-04-02T21:06:38+5:30
सन २०१२ पासून नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नसल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज करावे लागत आहे.

शिक्षण विभाग घेणार सेवानिवृत्तांची मदत : अपुरे मनुष्यबळ
नाशिक : सन २०१२ पासून नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नसल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज करावे लागत आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचे ठरविले आहे. शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येणार आहे.
नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार अशा चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात मोठ्या प्रमाणात कामकाज चालते. इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंतच्या शालेय शिक्षणाबाबत शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणे, शैक्षणिक समन्वयक, संच, शाळा व शिक्षक मान्यता देणे, तसेच अध्यापक विद्यालयांची कार्यवाही करणे आदि कामकाज या कार्यालयामार्फत चालते. शैक्षणिक कामकाजासंदर्भातील संगणकीय कामे तसेच न्यायालयीन कामे आणि इतर कामांचाही मोठा ताण या कार्यालयात असतो. परंतु कमी मनुष्यबळावरच येथील कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागते.
विशेषत: शैक्षणिक वर्ष सुरू होताना कार्यालयात चारही जिल्ह्यांतून कामकाजाचा मोठा ताण वाढतो. तसेही वर्षभर अनेक महत्त्वाची कामे सुरूच असतात. मात्र कमी मनुष्यबळ असल्याने वेळेत कामे पूर्ण करण्याच्याही अडचणी निर्माण होत असतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या तरतुदीनुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने करार पद्धतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्तीसाठीचे आवाहन केले आहे. शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या करारावर सेवेसाठी घेतले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाच्या कामकाजाचा अनुभव असल्याने कामकाज करणे सुलभ होते असल्याने शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्यांना काम करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.