रेशन घोटाळ्यातील घोरपडेंची मालमत्ता जप्त
By Admin | Updated: October 6, 2015 22:51 IST2015-10-06T22:40:55+5:302015-10-06T22:51:45+5:30
मोक्कान्वये कारवाई : चार महिन्यांपासून आरोपी फरार

रेशन घोटाळ्यातील घोरपडेंची मालमत्ता जप्त
नाशिक : सुरगाणा येथील शासकीय गुदामातील कोट्यवधी रुपयांच्या धान्य घोटाळ्यानंतर अवघ्या काही दिवसांतच सिन्नरच्या रेशन दुकानातील तांदळाचा काळाबाजारासाठी अपहार केल्या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत मोक्कान्वये गुन्हा दाखल असलेले संपत घोरपडे व त्यांच्या दोघा भावांची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली असून, आज बुधवारी जर संशयित आरोपी न्यायालयासमोर हजर झाले नाहीत, तर त्यांच्या नावे असलेली संपत्ती शासन जमा होण्याची शक्यता आहे.
राज्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार संदर्भातील आरोपींवर पहिल्यांदाच मोक्कान्वये कारवाई करण्याच्या गुन्ह्णात संपत नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे, विश्वास नामदेव घोरपडे रा. गोविंदनगर, तसेच सिडकोतील शिवशक्ती चौक येथे राहणारे रमेश सोमनाथ पाटणकर, मगन रतन पवार अशा पाच जणांचा समावेश आहे. सिन्नर तालुक्यातील रेशन दुकानावर पोहोचविण्यासाठी दिलेला तांदूळ भरलेला टेम्पो पळवून रेशन धान्याचा अपहार केल्याची घटना मे महिन्याच्या अखेरीस घडली होती. याच दरम्यान राज्यात सुरगाणा येथील शासकीय गुदामातील धान्याच्या अपहाराचे प्रकरण गाजत असतानाच अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्कान्वये कारवाई करण्याची घोषणा केली होती.
त्याचाच आधार घेऊन वाडीवऱ्हे पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध मोक्कान्वये गुन्हा दाखल केला, तेव्हापासून पाचही आरोपी फरार झाले आहेत. यासंदर्भात पोलिसांनी न्यायालयात केलेल्या अर्जाचा आधार घेऊन मोक्का विशेष न्यायालयाने फरार आरोपींच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याबाबतचा जाहीरनामा प्रसिद्ध केला व त्याच्या आधारे त्यांच्या मालमत्तेचा शोध घेण्यात आला. याबाबत पोलिसांनी तहसीलदार, सहनिबंधकांना पत्र पाठवून संशयित आरोपींच्या नावे असलेल्या मालमत्तेची माहिती गोळा केली. त्यानुसार घोरपडे बंधूंच्या मालमत्तेवर तशा नोटिसाही बजाविण्यात आल्या आहेत. मोक्कान्वये करण्यात आलेल्या कारवाईनुसार सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी ७ आॅक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली असून, ते जर हजर झाले नाहीत तर मालमत्ता जप्तीवर न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्कामोर्तब होणार आहे.
घोरपडे बंधूंवर गुन्हेच गुन्हे
नाशिक जिल्ह्णात रेशनच्या धान्याचा काळाबाजाराच्या अनेक घटना घडल्या असून, त्यातून वेळोवेळी गुन्हे दाखल झालेले असले तरी, या गुन्ह्णांमध्ये संपत घोरपडे याचे नाव कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहर व ग्रामीण भागात जवळपास १२ गुन्हे दाखल असून, काळाबाजारातूनच त्याने कोट्यवधीची मालमत्ता जमा केल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.