मालमत्ताधारकांनी आचारसंहिता भंगाचे गुन्हे नोंदवावे
By Admin | Updated: January 21, 2017 22:47 IST2017-01-21T22:46:48+5:302017-01-21T22:47:09+5:30
राधाकृष्णन : अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत आदेश

मालमत्ताधारकांनी आचारसंहिता भंगाचे गुन्हे नोंदवावे
नाशिक : जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाबरोबरच जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, राजकीय पक्ष वा उमेदवारांकडून आचारसंहिता भंगाचे प्रकार घडू शकतात. अशावेळी ज्या सार्वजनिक मालमत्ताधारकाच्या अखत्यारित आचारसंहिता भंग केली जाईल, त्या यंत्रणेने तत्काळ पोलिसांत गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिल्या आहेत. नियोजन भवन येथे पोलीस, महसूल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, महावितरण, सार्वजनिक बांधकाम आदि विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्याबाबत सूचना देतानाच त्यासंदर्भात शंका-कुशंकांचे निरसनही करण्यात आले. निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी राजकीय पक्ष व उमेदवारांची असली तरी, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सर्वच शासकीय यंत्रणेची असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यात तीन भरारी पथके तत्काळ गठीत करण्यात यावी, तसेच मतदारांना प्रलोभने, पैसे व मद्याचे वाटप होत असेल तर असले गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व महसूल अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्त कारवाई करावी, विजेच्या खांबावर ध्वज, फलक लावलेले असतील तर त्याबाबत महावितरण कंपनीने तक्रार द्यावी, तर सार्वजनिक रस्त्यांवर संपर्क कार्यालये उभारली असतील तर सार्वजनिक बांधकाम खात्याने पोलिसांत तक्रार द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.