इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांसाठी दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 01:00 IST2020-12-23T21:57:48+5:302020-12-24T01:00:26+5:30
नांदूरशिंगोटे : परिसरातील २० ते २५ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, नामनिर्देशन पत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

सिन्नर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करताना.
नांदूरशिंगोटे : परिसरातील २० ते २५ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, नामनिर्देशन पत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे.
अर्ज दाखल करताना १५ ते १६ कागदपत्रांची पूर्तता लागणार असल्याने पहिल्या दिवशी त्यासाठी धडपड सुरू होती. नांदूरशिंगोटे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने परिसरातील गावांचा दररोज येथे राबता असतो. भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, दापूर, चापडगाव, धुळवड, शिवाजीनगर, दत्तनगर, गोंदे, खंबाळे, दातली, सुरेगाव, मऱ्हळ बुद्रुक, मऱ्हळ खुर्द, निऱ्हाळे, मानोरी, कणकोरी आदी ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली असून, गावातील दोन्हीही गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, तर इच्छुक उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत.
इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करताना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे बंधनकारक असल्याने नांदूरशिंगोटे येथील बँकेत इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली. परिसरातील ग्रामपंचायतीत विविध दाखले जमा करण्यासाठी तसेच थकीत करभरणा करण्यासाठी गर्दी झाली होती. गावपातळीवरील गटावर तसेच वाड्यावाईज कोपरा बैठकांना प्रारंभ झाला आहे. या वेळेस निवडणूक लढविण्यासाठी तरुण प्रयत्नशील आहेत.
पॅनल निर्मितीचा प्रश्न
ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने गावोगावी तयारी सुरू झाली आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने पॅनल निर्मिती कोणी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक आवेदन पत्र, अनामत रक्कम, ग्रामपंचायतीची थकबाकी, प्रचार यंत्रणा आदी खर्चिक बाबी सरपंचपदासाठी दावेदार असलेली व्यक्ती सांभाळायची. त्यामुळे सेनापतीच घोषित नसल्याने पॅनलचा खर्च कोणी सांभाळायचा हा प्रश्न गाव पुढाऱ्यांपुढे उभा राहिला आहे.