लेख टंडन यांना जीवनगौरव
By Admin | Updated: March 25, 2017 00:37 IST2017-03-25T00:36:56+5:302017-03-25T00:37:42+5:30
नाशिक : नाशिकमधील कलावंतांनी चित्रपट क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला असून, मुंबईपेक्षा नाशिकचे वातावरण चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी अनुकूल आहे

लेख टंडन यांना जीवनगौरव
नाशिक : नाशिकमधील कलावंतांनी चित्रपट क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला असून, मुंबईपेक्षा नाशिकचे वातावरण चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. तसेच भविष्यात नाशिक शहर आणि सभोवतालचा परिसर ‘शूटिंग हब’ बनू शकते असा विश्वास रावसाहेब थोरात सभागृह येथे सुरू असलेल्या नवव्या नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये (निफ) विविध मान्यवरांनी व्यक्त केला.
निफच्या उद्घाटनप्रसंगी चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक लेख टंडन यांना जीवनगौरव पुरस्कारने, तर किशोरी शहाणे यांना ‘निफ’ सन्मानाने गौरविण्यात आले. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक लेख टंडन आणि निम्मी यांना जाहीर करण्यात आला होता परंतु निम्मी या पुरस्कार सोहळ्यास अनुपस्थित होत्या. स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव-बेटी पढाओ आणि महिला सक्षमीकरण या संकल्पनेवर यावर्षीच्या निफ फेस्टिव्हलची रचना करण्यात आली आहे. निफ फेस्टिव्हलचे आयोजक मुकेश कणेरी यांनी या महोत्सवासाठी ३० देशांतून प्रतिनिधी आले असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. मुंबईतील वातावरण पूर्णत: व्यावसायिक असल्याने नाशिक हे भविष्यात शूटिंग हब म्हणून पुढे येऊ शकते असा विश्वास कणेरी यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये स्क्रिनिंग सुविधा निर्माण व्हावी अशी खंतही कणेरी यांनी यावेळी बोलून दाखविली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महापौर रंजना भानसी यांनी फाळके स्मारक येथे चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. या कार्यक्रमास महापौर रंजना भानसी, आयोजक मुकेश कणेरी, ज्येष्ठ अभिनेते रणजीत, माजी मंत्री बबन घोलप, अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रभावती कणेरी, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नगरसेवक हिमगौरी आडके, चित्रपट निर्माते सतीश राय, रवि बारटक्के, कथालेखक दिलीप शुक्ल, दिग्दर्शक बलराज वीज, श्याम लोंढे, लक्ष्मण सावजी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)