नाशिक : पाटबंधारे खात्यातीलच सहकाऱ्याचे वैद्यकीय बिल नाशिक विभागीय कार्यालयात मंजुरीकरिता पाठविण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी करून ती घेणारे अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील कनिष्ठ लिपिक महादेव भागाजी बनकर यांना अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले़ बनकर यांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पाटबंधारे विभागातील एका कर्मचाऱ्याने ९२ हजार १६२ रुपयांचे वैद्यकीय बिल तयार करून ते मंजुरीसाठी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक महादेव भागाजी बनकर यांच्याकडे १८ डिसेंबर २०१४ रोजी पाठविले होते़ या बिलातील त्रुटींची पूर्तता करून ते नाशिकच्या विभागीय कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्याकरिता बनकर यांनी पंधरा हजार रुपयांची मागणी केली़ अहमदनगर-औरंगबाद रोडवरील रमेश टी सेंटरसमोर बुधवारी कनिष्ठ लिपिक बनकर यांनी तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपये घेताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ (प्रतिनिधी)
पाटबंधारे विभागाच्या कनिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक
By admin | Updated: January 1, 2015 01:31 IST