नाशिक : सेपकटकरा खेळाच्या नाशिक जिल्हा संघाकडून खेळल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवून नगरच्या शासकीय कोषागारात २०१९ मध्ये लिपिकाची नोकरी मिळविलेल्या प्रभाकर धोंडीबा गाडेकर या तोतया खेळाडूला पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकऱ्या लाटण्याची प्रकरणे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
क्रीडापटूंसाठी शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षणाच्या असलेल्या सुविधेचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण वाढल्याचे या प्रकरणातून दिसून येत आहे. हा तोतया खेळाडू मूळचा जालना जिल्ह्यातील असून, त्याने नाशिक जिल्हा संघाकडून खेळल्याचे प्रमाणपत्र दाखवीत नोकरी मिळवत होती. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या अन्याय झालेल्या खेळाडूंनी गतवर्षी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांच्याकडे तक्रार दाखल करीत न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर बकोरिया यांनी या प्रकरणात लक्ष घालून राज्य सेपकटकरा संघटनेचे पदाधिकारी कुणाल अहिरे यांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. त्यानंतर पुढील तपासात शासकीय नोकरी लाटलेल्या गाडेकर याला अटक करण्यात आली आहे. या खेळाडूला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य खेळाडू आणि काही पदाधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोट
सेपकटकरा या खेळात नाशिकचे आम्ही पाच खेळाडू मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रतिनिधित्व करीत आहोत. मात्र, अन्य काही खेळाडूंना संघटनेच्या काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र दिली आहेत. या बोगस खेळाडूंमुळे आमच्यासारख्या प्रामाणिक खेळाडूंना पाच टक्के आरक्षणातील शासकीय नोकऱ्या मिळत नाहीत. बोगस प्रमाणपत्र प्रकरणाची खोलवर चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी.
योगेश चव्हाण, खेळाडू, सेपकटकरा